३८ कोटी खर्चुनही पिण्यासाठी गटारीचे पाणी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात (फोटो सौजन्य-Gemini)
इगतपुरी : अनेक वर्षापासून जीर्ण झालेल्या पाईपलाईनमध्ये गटार, नाल्याचे व शौचालयाचे घाण पाणी शिरत आहे. नव्या आणि जुन्या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे दुषित पाणी पुरवठा होत असून, शहरात साथीचे आजार पसरले आहेत. अनेक नागरिकांना वांत्या जुलाब, अतिसारसारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ३८ कोटी रुपये खर्चुनही नागरिकांना दुषित पाणी पिण्यासाठी मिळत असल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.
पावसाचे माहेरघर संबोधल्या जाणाऱ्या इगतपुरी शहरात नगरपरिषदेचा तलाव व तळेगाव डॅममधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र प्रत्येक वर्षी मार्च व एप्रिल महिन्यापासूनच पाण्याची टंचाई भासत असल्याने सन २०१८ मध्ये भावली डॅमचे पाणी शहरात आणण्यासाठी नगरपरिषद प्रशासन आणि गत सत्तेत असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून ३८ कोटी रुपये निधी आणला. पाईपलाईंचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने केलेली पाईपलाईन इस्टीमेंटप्रमाणे न टाकता काही ठिकाणी जुन्याच पाईपलाईनला जोडलेल्या आहेत. अनेक ठिकाणी लोखंडी पाईप न वापरता रबरी व प्लास्टीक पाईप वापरल्याने अनेक वेळा पाईपलाईन फुटून पाणी वाया गेल्याचे
दिसून आले आहे. तर नळ जोडणी करतेवेळी प्लास्टीकचे पाईपलाईन दिल्याने अनेक ठिकाणी पाईप लिकेज आहे तर काही ठिकाणी जुन्याच पाईपलाईनला मुख्य पाईपलाईन जोडली आहे.
शहराला पाणीपुरवठा करतांना पाण्याचे जलशुद्धीकरण होत नसल्यामुळे नागरिकांना दुषित पाणी प्यावे लागत आहे. तरीही पाणीपट्टी वसुलीचा धाक ठेवून प्रशासन मनमानी करीत आहे. वेळीच ठेकेदाराने नाल्या, गटार व शौचालयाजवळील पाईपलाईन बदली केली नाही तर नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याची नगरपरिषद प्रशासन काळजी घेतील का? की फक्त पाणीपट्टी, घरपट्टी पठाणी वसुली करतील असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारी ही योजना पूर्ण झालीच नाही, मात्र ठेकेदाराने तत्कालीन मुख्याधिकारी यांना हाताशी धरून पूर्ण बिल वसूल केले. तत्कालीन मुख्याधिकारी यांनी शहरातील पाईपलाईन पूर्ण झाल्याचे पाहिलेच नाही. तसेच पाणीपुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण असून, केवळ कागदावरच पूर्ण झाल्याचे दाखवले आहे.






