संग्रहित फोटो
केज : बारामती येथे वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीच्या मालकीचा केज येथील प्लॉट त्याच्या परस्पर बनावट व्यक्ती उभी करून आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्ती केज येथील दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित नसतानाही त्याच्या नावाने दस्तनोंदणी करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दस्तनोंदणी केल्याचा दावाही करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर केज पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रांशी संबंधित विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहन रवींद्र कोमटवार (रा. केज), प्रितम प्रकाश नांदेडकर (रा. अयोध्यानगर, धारूर) आणि शांतीनाथ प्रकाश काळे (रा. संभाजी चौक, धारूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोरडे वस्ती येथील प्रवीण निकम यांच्या नावे केज येथील गट क्रमांक २२८/२/४ मध्ये ३.६० आर क्षेत्रफळाचा खुला प्लॉट आहे. निकम यांनी हा प्लॉट १७ जानेवारी २०२३ रोजी कायदेशीररीत्या खरेदी केला होता. या मालमत्तेबाबत कोणताही वाद नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, १४ मे २०२५ रोजी केज येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्रमांक १६८१/२०२५ अन्वये या प्लॉटचे खरेदीखत करण्यात आले.
दस्तनोंदणीच्या वेळी टोपी घातलेल्या व्यक्तीला केले कॅमेऱ्यासमोर उभे
या खरेदीखतावर प्रितम प्रकाश नांदेडकर आणि शांतीनाथ प्रकाश काळे हे साक्षीदार असल्याचे नमूद आहे. दस्तनोंदणीच्या वेळी टोपी घातलेल्या एका अज्ञात व्यक्तीला कॅमेऱ्यासमोर उभे करण्यात आले आणि त्याच्यावर जुन्या दस्तावरील प्रवीण निकम यांचा फोटो वापरण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या खरेदीखतासोबत हद्द कायम, पोटहिस्सा जमीन मोजणीचा नकाशाही जोडण्यात आला आहे. मात्र, प्रवीण निकम यांनी असा नकाशा मिळवण्यासाठी उपाधीक्षक, भूमी अभिलेख, केज यांच्याकडे कोणताही अर्ज केला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे संबंधित मोजणी नकाशाही बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दखल न घेतल्याने न्यायालयात धाव
फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रवीण निकम यांनी संबंधित यंत्रणांकडे तक्रार केली. मात्र, तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी केज न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्या तक्रारीवरून सदर तीन जणांविरोधात केज पोलिस ठाण्यात रोहन रवींद्र कोमटवार (रा. केज), प्रितम प्रकाश नांदेडकर (रा. अयोध्यानगर, धारूर) आणि शांतीनाथ प्रकाश काळे (रा. संभाजी चौक, धारूर) यांच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे तपास करीत आहेत.
कार्यालयीन वेळेनंतर दस्तनोंदणीचा आरोप
संबंधित दस्तनोंदणी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सायंकाळी उशिरा करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बनावट मालक आणि साक्षीदार उभे करून दस्तनोंदणीची प्रक्रिया पार पडल्याचा दावा करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
हे सुद्धा वाचा : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ
तत्कालीन अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार ?
खरेदी-विक्री व्यवहाराच्या वेळी संबंधित व्यक्तींच्या आधारकार्डसह ओळखपत्रांची पडताळणी आणि व्हेरिफिकेशन करणे आवश्यक असते. या प्रकरणात आवश्यक पडताळणी करण्यात आली नसल्यास तत्कालीन दुय्यम निबंधक आणि संबंधित कर्मचाऱ्यांचीही भूमिका तपासली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.






