संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : एक एपीके फाइल इन्स्टॉल केली… मोबाइलचा ताबा गेला… आणि काही वेळातच तीन क्रेडिट कार्डावरून ८ लाख ५९ हजार ५९९ रुपये साफ झाले ! गॅस कनेक्शन बंद होणार या एका मेसेजने सुरू झालेल्या फसवणुकीत ५४ वर्षीय डॉक्टरांना सायबर चोरांनी काही तासांत गंडा घातला आहे. ही घटना १२ ते १३ डिसेंबर २०२५ दरम्यान संमित्र कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी तब्बल नऊ महिन्यानंतर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणात मुकेश टिंडुरामजी नाथानी (५४, रा. मंगल जगत, संमित्र कॉलनी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादीला १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता अनोळखी क्रमांकावरून तुमचे एमजीएल गॅस कनेक्शन बंद होणार आहे असा मेसेज आला. त्यासोबत संपर्कासाठी मोबाइल क्रमांक देण्यात आला होता. डॉक्टरांनी त्या क्रमांकावर फोन केला; मात्र संपर्क झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४६ वाजता त्याच क्रमांकावरून फोन आला. व कनेक्शन पूर्ववत करून देतो, असे सांगत भामट्याने व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवली. डॉक्टरांनी लिंक उघडून त्यावरील वेबपेजवर डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती भरली. त्यानंतर महानगर गॅस बिल अपडेट (१७) एपीके ही फाइल पाठवून इन्स्टॉल करण्यास सांगण्यात आले. डॉक्टरांनी फाइल इन्स्टॉल केली; मात्र त्यानंतर मागितलेली पुढील माहिती देण्यापूर्वी त्यांना संशय आला. एपीके इन्स्टॉल केल्यानंतर सुमारे तासाभरात आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर लॉगिन झाल्याचा संदेश आला. त्यापाठोपाठ क्रेडिट कार्ड व्यवहारांचे ओटीपी येऊ लागले.
हे सुद्धा वाचा : वहिनी बघून हसल्याचा राग अनावर; दिराने डोक्यात लोखंडी सळई घालून केला खून
क्रांतीचौक पोलिसांकडून तपास सुरू
ई-मेलवर आलेल्या व्यवहारांच्या माहितीनुसार, एचएसबीसी क्रेडिट कार्डवरून ४ लाख ४८ हजार २६४ रुपये, आयसीआयसीआयच्या एका क्रेडिट कार्डवरून ३ लाख १६ हजार ३०१ रुपये आणि दुसऱ्या कार्डवरून ९५ हजार ३४ रुपये असे एकूण ८ लाख ५९ हजार ५९९ रुपये वळते करण्यात आले. ऑनलाइन तिकीट खरेदी तसेच विविध व्यापाऱ्यांच्या नावाने हे व्यवहार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी एनसीसीआरपी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे करीत आहेत.






