संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : घरासमोरील सांडपाण्यावरून सुरू असलेला वाद, त्यात मनात साचलेला राग आणि आपल्याकडे पाहून हसली या गैरसमजातून दिराने वहिनीच्या डोक्यात लोखंडी सळई घातल्याचा धक्कादायक प्रकार हर्षनगर, लेबर कॉलनी परिसरातून समोर आला आहे. लता गंगाधर साळवे (वय ५१) यांचा मृत्यू सुरुवातीला डोक्याला मार लागून झाल्याने अकस्मात मृत्यू म्हणून नोंदविण्यात आला होता. मात्र, मुलाने व्यक्त केलेला संशय आणि पोलिसांच्या तपासातून हा अपघात नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी लता यांचा दीर सुभाष कचरू साळवे याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. १६ सप्टेंबर रोजी दुपारी लता घराबाहेर फोनवर बोलत होत्या. त्यावेळी सुभाषने त्या आपल्याकडे पाहून हसल्याचा गैरसमज करून घेतला. त्यातच घरासमोरील सांडपाण्याच्या प्रश्नावरून दोघांमध्ये आधीपासून वाद होता. लता यांच्या बोलण्यामुळेच आपली पत्नी घर सोडून गेली, असा रागही सुभाषच्या मनात होता. या सगळ्याचा उद्रेक होऊन त्याने लता यांच्या डोक्यात सळईने वार केल्याचे तपासात समोर आले. शवविच्छेदनात डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अनिलने संशय व्यक्त केला. घटनेनंतर सुभाष पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथे फिरून आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
रिंग वाजूनही फोन उचलला नाही, तीन मिनिटांत सगळे घडले
दुपारी १२:५४ वाजता लता यांचे बहीण सुनीता यांच्याशी फोनवर बोलणे सुरू झाले. १२:५४ ते १२:५७ या कालावधीत अचानक काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि लता यांचा आवाज बंद झाला. याच वेळेत लोखंडी सळईने हल्ला झाल्याचा तपास आहे. १२:५७ वाजता सुनीता यांनी पुन्हा फोन केला; मात्र, रिंग वाजूनही फोन उचलण्यात आला नाही. दुपारी १:०७वाजता शेजाऱ्यांनी लता बेशुद्ध पडल्याची माहिती मुलाला दिली. त्यानंतर त्यांना घाटीत नेण्यात आले आणि १:४५ वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
सळईचा शोध सुरू
गुन्ह्यात वापरलेली लोखंडी सळई अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. आरोपीला २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याने या काळात हत्यार जप्त करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर घटनेच्या वेळेतील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, फोनवरील संपर्क आणि अन्य तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. गुन्ह्याच्या घटनाक्रमाला न्यायालयीन पातळीवर पुष्टी देणारे पुरावे संकलित करण्यावर पोलिसांचा भर आहे.






