संग्रहित फोटो
श्रीरामपूर : राज्यासह देशभरात मारहाणीच्या घटना वाढत आहेत. अशातच आता श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे तरुणाच्या संशयास्पद मृत्यूने निर्माण झालेले गूढ अखेर उकलले असून, श्रीरामपूर शहर पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा केला आहे. सख्ख्या मोठ्या भावाच्या दारूच्या व्यसनामुळे आणि भांडखोर वृत्तीमुळे आपले लग्न जमत नसल्याच्या रागातून लहान भावानेच त्याची टणक हत्याराने मारहाण करून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी लहान भावाला अटक केली आहे.
आशिष उर्फ लाल्या विजय पारखे (वय २७, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) असे मृत मोठ्या भावाचे नाव असून, आरोपी अनिकेत विजय पारखे (वय २६) असे खून करणाऱ्या लहान भावाचे नाव आहे. दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी मयत आशिष हा त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या डाव्या कानाखाली मानेवर गंभीर जखम असल्याने पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह प्रवरा हॉस्पिटल, लोणी येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. वैद्यकीय अहवालात टणक हत्याराने मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याने हा घातपात व खून असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी मृताच्या पत्नीसह नातेवाईकांची कसून चौकशी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयत आशिष याला दारूचे तीव्र व्यसन होते. तो दारू पिऊन घरात सतत आरडाओरडा करत असे, आशिषच्या या त्रासामुळे त्याची पत्नी गेल्या चार महिन्यांपासून वडिलांकडे राहत होती. मोठा भाऊ आशिषच्या दारू पिण्याच्या व आरडाओरड्याच्या सवयीमुळे आपले लग्न जमत नसल्याची भावना लहान भाऊ अनिकेतच्या मनात निर्माण झाली होती. याच वैमनस्यातून त्याने मोठ्या भावाला संपवल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली होती.
याप्रकरणी मृत आशिष यांची पत्नी साक्षी आशिष पारखे (रा. उक्कलगाव ) यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपी लहान भाऊ अनिकेत पारखे यास तात्काळ अटक केली असून, पुढील तपास सुरू आहेत. श्रीरामपूर पोलिसांच्या या जलद व धडाकेबाज कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.






