
जुन्या वादातून शेतकऱ्याला मारहाण, दगडाने नाकावर वार; तिघांवर गुन्हा दाखल
आळेफाटा : राज्यासह देशभरात गुन्हेगारीन डोकं वर काढलं आहे. दररोज खून, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. अशातच आता बेल्हे येथील ढोलेमळा परिसरात जुन्या आर्थिक वादातून एका शेतकऱ्याला दगड आणि लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन एकनाथ गुंजाळ (वय ३०, रा. बेल्हे रानमळा, ता. जुन्नर) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. ही घटना दिनांक ९ जून रोजी सायंकाळी सुमारे ५.४६ वाजण्याच्या सुमारास बेल्हे-आळकुटी रस्त्यावरील चारंगबाबा मंदिराजवळ घडली आहे. फिर्यादी नितीन गुंजाळ हे शेतात खत पांगविण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन जात असताना समोरून मोटारसायकलवर आलेल्या चंद्रकांत सखाराम गुंजाळ यांच्याशी त्यांचा वाद झाला. यावेळी चंद्रकांत गुंजाळ यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
त्यानंतर वेदांत शशिकांत गुंजाळ याने दगडाने नाकावर वार केल्याने रक्तस्त्राव झाल्याचे, तर बबलू शशिकांत गुंजाळ याने लोखंडी रॉडने पाठीवर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच पुन्हा दगडाने डोक्यावर मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मध्यस्थी करत वाद सोडविला.
जखमी नितीन गुंजाळ यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर त्यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी चंद्रकांत सखाराम गुंजाळ, वेदांत शशिकांत गुंजाळ आणि बबलू शशिकांत गुंजाळ (सर्व रा. ढोलेमळा रानमळा, ता. जुन्नर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : धाराशिवमध्ये खळबळ! तरुणीचे अपहरण करून जबरदस्ती विवाह; मोटारसायकलवर बसवून नेले अन्…
पुण्यात महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न
पूर्वी दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकत महिलेला कारने उडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरात घडली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वसुधा धनंजय गरड (वय २९, रा. महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमीर रशिद शेख (वय ३२), हैदर रशिद शेख (वय ३४, दोघेही रा. कलवड) तसेच अन्वर पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ११ जून रोजी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास शांतिरक्षक सोसायटीच्या गेटसमोर घडली आहे.