सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात कोणतीही पूरस्थिती उद्भवू नये आणि नागरिकांना सुरक्षित राहावे, यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्रशासनाला ‘वॉर फूटिंग’वर काम करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. शनिवारी स्वतः शहरातील विविध नाले आणि नदीपात्रांची प्रत्यक्ष पाहणी करत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना ‘एसी केबिन’ सोडून प्रत्यक्ष मैदानात उतरण्याचे आवाहन केले आहे.
‘डेंजर झोन’वर विशेष लक्ष
आयुक्तांनी शिक्षक कॉलनी आणि पिंपळे निलख परिसरातील मुळा नदीपात्राची पाहणी करत पाणी वहनक्षमतेचा आढावा घेतला. अतिवृष्टीच्या काळात सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता, अशा ‘डेंजर झोन’ची यादी तयार करून तेथे २४ तासांत प्रतिबंधात्मक उपाययोजना पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
अतिक्रमणधारकांवर धडक कारवाईचे संकेत
शहरातील नाले आणि नैसर्गिक प्रवाहांवर उभी राहिलेली अनधिकृत अतिक्रमणे हेच पूरस्थितीचे प्रमुख कारण असल्याचे निरीक्षण आयुक्तांनी नोंदवले. “नाल्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या कोणत्याही अतिक्रमणाची गय केली जाणार नाही,” असे सांगत, त्यांनी अशांवर कठोर आणि थेट कारवाई करण्याचे निर्देश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
अधिकाऱ्यांचा मोठे फौजफाटा मैदानात
आयुक्तांच्या या पाहणी दौऱ्यात प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः सक्रिय दिसून आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, राजू साबळे, तसेच क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, अजिंक्य येळे, पूजा दूधनाळे, अश्विनी गायकवाड, योगेश फल्ले, अंकुश झिटे आणि शांताराम माने यांच्यासह संबंधित कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा : देहूतील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत; आषाढी वारीपूर्वी पर्यावरणीय संकट
नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
पावसाळ्यात सामान्य नागरिकांना कोणताही मनस्ताप सहन करावा लागू नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून २४ तास सतर्क राहण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. शहरात कुठेही पाणी साचणार नाही आणि पावसाळा सुरळीत पार पडेल, यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.






