संग्रहित फोटो
छत्रपती संभाजीनगर : पैठण येथील न्यायालयीन कामकाज आटोपून छत्रपती संभाजीनगरकडे परतणाऱ्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी वाहन चालकाला कड्याने मारहाण करण्यात आली. तर वाहनावर हातोड्याने हल्ला करुन वाहनाच्या दरवाज्याचे नुकसान करण्यात आले आहे. ही घटना २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास विट्स हॉटेल चौकात घडली आहे. या प्रकरणात मारहाण करुन कारचे नुकसान करणाऱ्या दोघां अज्ञातांविरोधात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात शेख एकबाल शेख इब्राहिम (वय ४६, रा. गल्ली क्रं.२२, बायजीपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी हे जिल्हा न्यायालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. ते सध्या मुख्य न्याय दंडाधिकारी आर.एस. जांबोटकर यांच्या शासकीय वाहनावर चालक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी नियमित ड्युटीवर आल्यानंतर त्यांनी जांबोटकर यांना त्यांच्या निवासस्थानावरून न्यायालयात आणले. त्यानंतर न्यायालयीन कामकाज व निरीक्षणासाठी जांबोटकर यांच्यासह वरिष्ठ लिपिक वैद्य आणि शिपाई साहेबराव पाटील यांना घेऊन ते शासकीय वाहनाने पैठण न्यायालयात गेले होते. पैठण येथील कामकाज आटोपल्यानंतर चौघेही शासकीय वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे परतत होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास रेल्वे स्टेशन रोडवरील विट्स हॉटेल चौकात वाहन आले असता अचानक एक दुचाकी वाहनासमोर आल्याने चालकाने गाडी थांबविली. त्यावेळी वाहनातील शिपाई साहेबराव पाटील यांनी दुचाकी बाजूला घेण्याचा हाताने इशारा केला.
चालकाला कड्याने तर कारवर होताड्याने हल्ला
याचा राग आल्याने दुचाकीस्वार खाली उतरला आणि शिवीगाळ करीत शासकीय वाहनाच्या काचेवर हाताने मारत काच उघडण्यास सांगू लागला. चालकाने काच न उघडल्याने त्याने गोंधळ घातला. त्याचवेळी त्याच्यासोबत असलेल्या अन्य दुचाकीवरील व्यक्तीने दुचाकीच्या हॅण्डलवर ठेवलेली हातोडी काढली आणि शासकीय वाहनाच्या चालकाच्या बाजूच्या दरवाजावर मारण्यास सुरुवात केली. दरम्यान, चालकाने काच खाली केली असता दुचाकीस्वाराने हातातील कडे काढून चालकाच्या तोंडावर जोरदार वार करुन जखमी केले. या प्रकारामुळे चौकात नागरिकांची गर्दी जमा झाली.
कारवरील नाव पाहताच पसार
वाहनावर मुख्य न्याय दंडाधिकारी, औरंगाबाद असे लिहिलेले असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित व्यक्तींनी आपली वाहने बन्सीलालनगरच्या दिशेने नेत धूम ठोकली. घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.






