साडेचार वर्षाच्या चिमुरडीवर युवकाकडून अत्याचार (File Photo : Crime)
नंदुरबार : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यात नंदूरबारमध्येही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये अपहरण केलेल्या दोन मुलींवर दोन तरुणांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात असताना एका मुलीने जोरदार प्रतिकार करून स्वतःची सुटका करून घेत पळ काढला. परंतु, त्यांच्या तावडीत सापडलेल्या दुसऱ्या मुलीवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट; बंधु धनंजय देशमुख न्यायालयातील याचिका मागे घेणार
उपनगर पोलिसांनी यातील दोन्ही तरुणांना तातडीने अटक केली असून, न्यायालयाने 11 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 6 जानेवारी रोजी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री दहा वाजेपासून शनिवारी रात्री एक वाजेपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.
अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करून घेणारी मुलगी 14 वर्षे वयाची आहे तर अत्याचाराला बळी पडलेली मुलगी 19 वर्षांची आहे. या दोन्ही मैत्रिणींना कोठली गावच्या आश्रमशाळेच्या गेटजवळ रोहित व सुनील नावाच्या दोन जणांनी गाठले. दोघांनी मोटरसायकलवर बसण्यास भाग पाडले. गावापासून निंबोणी रस्त्याने सुमारे एक कि.मी. अंतरावर पपईच्या शेतात नेऊन अत्याचार केला. या अत्याचारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
प्रतिकार करून एकीने काढला पळ
या दोन नराधमांनी अत्याचाराचा प्रयत्न केला. या प्रयत्नात असताना एका मुलीने जोरदार प्रतिकार करून स्वतःची सुटका करून घेत पळ काढला. त्यामुळे ती सुखरुपपणे तावडीतून सुटली. मात्र, एक तरुणी त्यांच्या जाळ्यात अडकली. संबंधित तरूणीवर या नराधमांनी सामूहिक अत्याचार केला.
वाशिममध्येही अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार
वाशिम जिल्ह्यातील आंध्रड येथील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेत शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी डोणगाव पोलिसांनी दोन मुलांच्या बापाला अटक केली असून, त्या आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे. आंध्रड येथील एका 17 वर्षीय मुलीला आरोपी अमोल विजय लोखंडे (रा. नावली, ता. रिसोड, जि. वाशीम) याने 7 डिसेंबरला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. त्यानंतर नाशिक येथे सदर मुलीच्या मनाविरुद्ध आरोपीने शारीरिक संबंध ठेवले.
पीडित मुलीच्या आईची पोलिसांत तक्रार
याबाबत मुलीच्या आईने डोणगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली असता आरोपीविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप सावळे व कर्मचाऱ्यांचे पथकाने आरोपीचा शोध सुरू केला.