सौजन्य फोटो - सोशल मिडीया
बीड : शहरातील खासबाग परिसरातील बिंदुसरा नदीपात्रात तीन ते चार महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला. चिमुकलीला तीन-चार दिवसांपूर्वी नदीपात्रात टाकण्यात आले असावे, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना चिमुकलीचा मृतदेह प्रथम दिसला. मृतदेहाची स्थिती पाहून त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. मृतदेहाचे काही भाग जखमी अवस्थेत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या घटनेचे वृत्त समोर येताच परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा: अबब! दारूबंदीच्या जावळीत उत्पादन शुल्क विभागानेच पकडली दारू; एकाच दिवशी आठ ठिकाणी कारवाई
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे एपीआय राठोड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तो जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात चिमुकलीच्या अंगावर गुलाबी रंगाचा फ्रॉक असल्याचे आढळले. तसेच तिच्या हातात काळ्या-पिवळ्या मण्यांच्या मनगट्या होत्या. या आधारे चिमुकलीची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.
हेही वाचा : Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणीचा छळ; पाठलाग, धमकी अन् घरात घुसून तरुणीवर…
चिमुकलीला बिंदुसरा नदीवरील पुलावरून नदीपात्रात फेकण्यात आले की कोणी नदीपात्रात उतरून तिला तेथे ठेवले, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत असून, त्यातून संशयित व्यक्ती किंवा वाहनाबाबत काही माहिती मिळते का, याचा शोध घेतला जात आहे.
एवढ्या लहान चिमुकलीचा मृतदेह नदीपात्रात आढळल्याने बीड शहरात दुःख आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या उपक्रमांतून मुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती केली जात असतानाही अशा घटना घडत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास करून चिमुकलीला नदीपात्रात टाकणाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.






