वैष्णवी हगवणेच्या बाळाचे अपहरण आणि हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल
मुळशी: मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाकडे दुर्लक्ष व हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण २१ मेपासून निलेश चव्हाण फरार असल्याने बावधन पोलिसांनी त्याचा शोधही सुरू केल्या आहे. निलेश चव्हाण याचेही नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर कारवाई करत पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली आहेत. त्याच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना रवाना करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश चव्हाणविरोधात गुन्हा दाखल असून, त्याच्या वारजे येथील घरासह इतर ठिकाणीही छापे टाकण्यात आले आहेत. तपासादरम्यान त्याचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे. याशिवाय चव्हाण याचे वडील आणि भाऊ यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलवलं आहे. त्या दिवशी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनाही चौकशीसाठी समन्स देण्यात येत आहेत. याशिवाय, निलेश चव्हाण व त्याच्या भावाला कायदेशीर नोटीस दिली आहे. चौकशीत सहकार्य न केल्यास किंवा गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिल्याचे उपायुक्त संभाजी कदम यांनी स्पष्ट केले आहे.
वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याची हेळसांड केल्याचा आरोप निलेश चव्हाणवर करण्यात आला आहे. बाळाचे अपहरण आणि त्याची हेळसांड करण्यासाठी बावधन पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 मे रोजी वैष्णवी हगवणेने आत्महत्या केल्यानंतर वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणेने त्यांचे बाळ निलेशच्या ताब्यात दिले. 20 मे रोजी बाळ परत घेण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या माहेरच्यांना निलेशने बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप आहे. यासंदर्भात वारजे पोलिस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
21 मे रोजी कस्पटे कुटुंबीयांनी बाळ परत घेण्याचा पुन्हा प्रयत्न केला, तेव्हाही निलेशने बाळ पिरंगुट गावातील एका व्यक्तीकडे सोपवले. त्यानंतर दुपारी बाळ पुणे-मुंबई महामार्गावर मोहन कस्पटे यांच्या हवाली करण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत बाळाची मोठी हेळसांड झाली, अशी तक्रार वैष्णवीच्या नातेवाईकांनी दिली आहे. या तक्रारीच्या आधारे निलेश चव्हाणविरोधात बाळाच्या अयोग्य ताब्याशी संबंधित गुन्हा अधिकृतपणे नोंदवण्यात आला आहे.