केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर; आधी चेतनने ढकलले अन् नंतर सियाने...
पुणे : लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतनची नियोजित वधू सियाने त्याला बोलण्यात गुंतवून निर्जन कड्यालगत नेले आणि दबा धरून बसलेला सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीने मागाहून येत त्याला दरीत ढकलले. चेतन तेथून निघून गेला आणि मग सियाने आरडाओरडा करत पोलिसांचे म्हणणे आहे.
लोहगड किल्ल्यावरून १८ जून रोजी पडून केतन अग्रवालचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात भासविण्यात आला होता. तपासानुसार, चेतन हा सिया आणि केतन यांच्याआधीच लोहगडावर पोहोचला होता. पायऱ्यांच्या मार्गाजवळ तो आसपास वावरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. योग्य संधीची वाट पाहत तो परिसरात थांबला होता. सीसीटीव्हीत सिया आणि चेतन यांच्यातील खाणाखुणाही कैद आहेत. घटनास्थळाच्या पंचनाम्यातही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. कड्याजवळ वाढलेले गवत ओरबाडले गेल्यासारखे दिसून आले आहे. पोलिसांनुसार, ते ठिकाण एखाद्याचा सहज तोल जाऊन दरीत पडण्यासारखे नाही. त्यामुळे प्रत्येक पुरावा बारकाईने तपासला जात आहे.
दरम्यान, घटनास्थळी गवतावरील व्रण आणि दाबलेल्या भागामुळे केतनने प्रतिकार केला असण्याची शक्यता यंत्रणा तपासत आहे. प्राथमिक अंदाजानुसार, आरोपींशी झटापट झाल्यानंतर त्याला कड्याच्या दिशेने ओढत नेण्यात आले असावे. मात्र, नेमका घटनाक्रम काय होता, याबाबत आरोपींची चौकशी, तांत्रिक पुरावे आणि इतर साक्षींच्या आधारे पुढील तपास सुरू असून, त्यातून अधिक माहिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी
‘पासपोर्ट’ मिसींगवरून पोलिसांनी सुरू केलेला तपास आणि केतनच्या बहिणीने दिलेल्या माहितीवरून लोहगडावरील हायप्रोफाईल केतन अग्रवाल हत्येचा उलगडा झाल्याचे समोर आले आहे. चित्रपटाची कथा शोभावी तसा पोलिसांनी या हत्येचा छडा लावला, पण आरोपींना अटक करून ‘कानून के हात लंबे होते हैं’, हे दाखवून दिले. सिया प्रवीण गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन बाबूलाल चौधरी यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मोबाईलची अदलाबदली; हजारो वेळा दोघांत कॉल
पोलिसांनी घटनेच्या काळातील 5 तासांचा तांत्रिक तपास केला. चेतनच्या मोबाईलचे लोकेशन मार्केटयार्डत येत होते. तो चेतनच असल्याने तपास केला असता या काळात चेतनला आलेले फोन कोणी उचलले आणि काय बोलले याची माहिती घेतली. तेव्हा, कामगाराने हे फोन उचलल्याचे समजले. चेतनला ३ फोन आले होते, ते कामगाराने घेतले होते. कामगाराच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता ते मात्र लोहगडमध्ये आले. कामगाराच्या चौकशीत महत्त्वाची बाब समोर आली.






