जामिनावर बाहेर आलेल्या गुंडाची दगडाने डोके ठेचून हत्या; आधी वाद झाला अन् नंतर थेट खूनच
नागपूर : वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला सराईत गुन्हेगार प्रतीक राजू करांडेकर (वय 20, रा. पारडी) याची दगडाने डोके ठेचून हत्या केली. त्याचा मृतदेह सिम्बॉयोसिस महाविद्यालयामागील झुडपांत आढळला. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
२०२५ मध्ये एचबी टाऊन परिसरात झालेल्या खुनाच्या प्रकरणात प्रतीक व तिघा साथीदारांना अटक झाली होती. दोन महिन्यांपूर्वीच तो आणि दोन साथीदार जामिनावर बाहेर आले होते. गुरुवारी सायंकाळी प्रतीक दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला. शुक्रवारी सकाळी स्थानिकांना सिम्बॉयोसिस महाविद्यालयामागील झुडपांत तरुणाचा मृतदेह दिसला. माहिती मिळताच वाठोडा पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, प्राथमिक तपासात घटनेपूर्वी प्रतीक काही युवकांसोबत परिसरात मद्यपान करत असल्याचे समोर आले आहे. मद्यपानादरम्यान झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात आरोपींनी मोठा दगड उचलून प्रतीकच्या डोक्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रतीकचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.
गर्भवती पत्नीची जवानाने केली हत्या
सैन्य दलात असणाऱ्या लष्कर जवानाने आपल्या 7 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पतीसह सासू-सासऱ्यांना अटक केली आहे.
प्रियकराने 6 महिन्यांच्या चिमुकल्याचा गळा आवळून खून
उत्तर प्रदेशातील नौचंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी उघड्या गटारात सापडलेल्या सहा महिन्यांच्या मुलाच्या मृतदेहामागील गूढ पोलिसांनी अखेर उलगडले आहे. पोलीस तपासादरम्यान समोर आलेल्या तथ्यांमुळे नातेसंबंध, आईचे प्रेम, माणुसकी आणि विश्वास हे सर्व प्रश्नांच्या पिंजऱ्यात उभे राहिले आहेत. इन्स्टाग्रामवर जुळलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्या नात्याची किंमत सहा महिन्यांच्या साहिलला आपल्या प्राणांनी चुकवावी लागली.






