उमेदवारासोबत फिरणे पोलिसाला भोवले (संग्रहित फोटो)
हिंगोली : नगरपरिषदांसह इतर स्थानिक निवडणुका घेतल्या जात आहेत. अनेकजण दाखल केलेले अर्ज माघारी घेताना दिसत आहे. असे असताना आता मात्र हिंगोलीत एक वेगळाच प्रकार पाहिला मिळाला. हिंगोली पालिका निवडणुकीत राजकीय पक्षाच्या उमेदवारासोबत प्रचारासाठी फिरल्याच्या आरोपावरून पोलिस कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
बालाजी गुंडे असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुंडे हे सध्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. मात्र, ते एका राजकीय पक्षाच्या उमेदवारासोबत फिरत असल्याचा फोटो समोर आला होता. याबाबतची तक्रारच पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार, या तक्रारीची चौकशी सुरु करण्यात आली होती. सदर चौकशी पूर्ण होईपर्यंत पोलिस कर्मचारी गुंडे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या या निलंबनाचे आदेश पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गुरुवारी (दि.२०) काढले आहेत.
दरम्यान, पोलिस अधीक्षकांच्या कडक भूमिकेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोलीसह कळमनुरी व वसमत पालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. यातच स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस कर्मचारी बालाजी गुंडे हे एका राजकीय पक्षाच्या उमेदवारासोबत फिरतानाचे फोटो समोर आल्यानंतर त्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
पुण्यात दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई
वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती ‘डायल ११२’ वर प्राप्त झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी वेळेत न पोहोचता पोलिसी जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यातील दोन बीट मार्शल पोलिस शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. मुकुंद जयराम शिंदे आणि विजय हरिभाऊ पोटे अशी निलंबित केलेल्या पोलिस कर्मचार्यांची नावे आहेत. दोघेही हडपसर पोलिस ठाणे हद्दीतील हडपसर कॉप्स २४ बीट मार्शल, गुन्हे शाखा, पुणे शहर येथे कार्यरत होते.
हेदेखील वाचा : कुत्र्याला पाहून इलेक्ट्रिशियन कामगार घाबरला; पळताना तिसऱ्या मजल्यावरून पडला अन्…






