सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल 38 लाखांना घातला गंडा
पुणे : सायबर फसवणूकीचे सत्र कायम असून, वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांना सायबर चोरट्यांनी तब्बल ३८ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी पर्वती आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली आहे.
तक्रारदार अरण्येश्वर भागात राहायला आहेत. गेल्या महिन्यात १५ डिसेंबर रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्यांना एका नामांकित बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. त्यांना अधिकारी बोलत असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. त्यांना डेबिट कार्ड सुविधा अद्ययावत करण्यात येत आहे, अशी माहिती दिली. नंतर त्यांच्याकडून बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. नंतर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून १९ लाख ९० हजार रुपये चोरून नेले. अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल मोरे तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत सायबर चोरट्यांनी हडपसरमधील ज्येष्ठ नागरिकाची १८ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली. चोरट्यांनी २१ डिसेंबर रोजी त्यांना मोबाइलवर संपर्क साधला. गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीचे देयक थकीत असल्याने गॅस पुरवठा बंद करू अशी भिती दाखवली. नंतर देवेश जोशी असे नाव असणाऱ्या चोरट्याच्या मोबाइलवरून त्यांना संपर्क साधला. त्याने ऑनलाईन पेमेंटसाठी म्हणून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन खात्यातून १८ लाख २५ हजार रुपये चोरुन नेले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक काळंगे तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : Pune Accident : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; डॉक्टर महिलेचा मृत्यू
कारवाईची भीती दाखवून २३ लाखांची फसवणूक
गेल्या काही दिवसाखाली काळ्या पैसे व्यवहारात कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाला २३ लाख रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर विमानतळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार तरुण लोहगाव भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी त्याला मोबाइलद्वारे संपर्क केला. काळ्या पैसे व्यवहारात मुंबई गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यात तुमचे नाव असून, अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, अशी भीती दाखवून चोरट्यांनी तरुणाला तातडीने पैसे भरण्यास सांगितले. ऑनलाइन पद्धतीने तरुणाने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. तरुणाची २३ लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली.
हे सुद्धा वाचा : अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; अफू विक्री करणाऱ्याला ठोकल्या बेड्या