संग्रहित फोटो
पुणे : आयटी क्षेत्र असलेल्या खराडी परिसरात राजस्थानातील अफू विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले आहे. त्याच्याकडून २ लाख २२ हजार रुपयांची अफू, वजनकाटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विजयसिंग खिमासिंग राजपुरोहित (वय ३७, रा. क्रांतीपार्क, खराडी, मूळ ऱा. राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थ विरोधी पथक खराडी भागात गस्त घालत होते. तेव्हा संत तुकारामनगर भागातील दुकानाजवळ राजपुरोहित थांबला असून, त्याच्याकडे अफू असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेतली. तेव्हा पिशवीत दोन लाख २२ हजार रुपयांची १११ ग्रॅम अफू, वजनकाटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा अफू राजस्थानातील आहे. राजस्थानातील अफूला पुण्यात मोठी मागणी आहे. त्याठिकाणचा अफू पुण्यातील विशिष्ट तरुण तसेच काही कामगार वर्ग विकत घेत असल्याची माहिती पोलिसांच्या कारवाईतून वेळोवेळी समोर आलेली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, संदीप शिर्के व त्यांच्या पथकाने केली आहे.
हे सुद्धा वाचा : चाेरीचे सोने विक्री करणारी टाेळी गजाआड; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त
गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहराच्या मध्यभागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्या दोघांकडून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला असून, युनिट एकच्या पथकाने ही कारवाई शुक्रवार पेठेत केली आहे. समाधान केदा पवार (वय ३३, रा. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार सुजय रिसबुड व त्यांच्या पथकाने केली आहे.
शहरात ड्रग्ज पेडलरांची संख्या मोठी असून, त्यांच्याकडून किरकोळ स्वरूपात गांजा, एमडी तसेच इतर ड्रग्ज छुप्या पद्धतीने पुरविले जात असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. पोलिसांकडून या पेडलरांची झाडाझडती झाली असली तरी शहरात मात्र ड्रग्जचा पुरवठा सुरूचं आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेची पथके हद्दीत पेट्रोलिंग करत आहेत. यादरम्यान, युनिट एकच्या पथकातील एसपीटी मार्शलवरील पोलीस अंमलदार सुजय रिसबुड यांना माहिती मिळाली की, शुक्रवार पेठेत दोन तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्यानूसार, पथकाने परिसरात सापळा रचून अटक केली.