संग्रहित फोटो
पुणे : उशीर झाल्याने मुलाला शाळेतून आणण्यासाठी गडबडीत निघालेल्या डॉक्टर आईचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला. याघटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कात्रज-हांडेवाडी रस्त्यावर बुधवारी दुपारी हा अपघात ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. याप्रकरणी ट्रकचालकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. प्रणाली तन्मय दाते (वय ३४, रा. व्हीटीपी अर्बन सोसायटी, उंड्री) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक पांडुरंग बलभीम भोसले (वय ३५, रा. तुळजापूर, जि. धाराशिव) याला अटक करण्यात आली. स्नेहा अनिल कदम (वय ३९,रा. गोदरेज प्राणा सोसायटी, उंड्री) यांनी याबाबत काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, डॉ. दाते यांचा उंड्री परिसरात दवाखाना आहे. डॉ. दातेंचा मुलगा हांडेवाडी रस्त्यावरील एका शाळेत शिकतो. मुलाला शाळेतून आणण्यासाठी थोडा उशीर झाला होता. त्यामुळे बुधवारी (८ जानेवारी) दुपारी बाराच्या सुमारास त्या गडबडीने दुचाकीवरुन हांडेवाडी रस्त्याने जात होत्या. त्यावेळी ट्रक व दुचाकीचा विचीत्र अपघात झाला. डॉ. दाते रस्त्यावर पडल्या असताच ट्रकच्या पाठिमागील चाकाखाली त्या आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. घटनेची माहिती मिळताच काळेपडळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. डॉ. दाते यांच्यामागे पती व मुलगा असा परिवार आहे. त्यांचे पती डॉक्टर आहेत. पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर अधिक तपास करत आहेत.
महामार्गा ओलांडताना ज्येष्ठ महिलेचा अपघाती मृत्यू
मुंबई-बेंगलोर महामार्गावर रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. वारजेतील विनायक हॉस्पिटलसमोर रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. प्रिया विजय देशमुख (वय ६५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सावंत करत आहेत.
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू
वडगांव पुलावर भरधाव टेम्पोने पाठिमागून दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाला. पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे. पुनम प्रफुल वांजळे (वय ४५, रा. दत्तवाडी, शनिमंदिरामागे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी टेम्पो चालक बाळकृष्ण रबाजी गुंड (वय ४०, रा. अहमदनगर) याला अटक केली आहे. सिंहगड रोडवरून ज्योती गॅस अॅप्लायन्ससमोरून वडगांव पुलाकडे जात असताना पाठिमागून टेम्पोने वांजळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.