
(फोटो सौजन्य-Gemini)
३ एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यात्रास्थळी गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त घालत होते. यावेळी गुप्त बातमीदारामार्फत आमराई परिसरातील मंदिराजवळ दोन महिला व एक पुरुष संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवली आणि त्यानंतर तिघांना ताब्यात घेतले आहे. चौकशीत आरोपींनी आपली नावे अनिल शेषेराव शिंदे (वय ३४), सुनिता अनिल शिंदे (वय २९) व हिराबाई रमेश शिंदे (वय ४०, सर्व रा. इंदिरानगर पाथरी, जि. परभणी) अशी सांगितली आहेत. अंगझडती घेतली असता अनिल शिंदे याच्या खिशातून चार वेगवेगळी सोन्याची मंगळसूत्रे आढळून आली.
अंघोळीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी केल्याची कबुली दिली. सकाळी ७ ते ९ या वेळेत ही चोरी करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून एकूण १.३१ लाख रुपये किमतीचे चार मंगळसूत्रे जप्त केली आहेत.
धाराशीवमध्ये गुन्हांचे प्रमाण तसे वाढतच चालले आहे. नुकतंच शहरातील एका खाजगी माध्यमिक शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला किरकोळ कारणावरून काठीने मारहाण केल्याची आणि या प्रकरणी संबंधित शिक्षकावर पोलिसांत गुन्हा नोंद झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून संबंधित शिक्षकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
ही घटना १ एप्रिल रोजी जाधववाडी रोडवरील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथे घडली. साईरामनगर येथील गोपाळ नारायण कोळी यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा १३ वर्षीय मुलगा मनीषराज गोपाळ कोळी याने विशिष्ट वही आणली नसल्याच्या कारणावरून शिक्षक प्रफुल जाधव यांनी त्याला काठीने मारहाण केली. मारहाणीत विद्यार्थ्याच्या उजव्या खांद्यावर, डाव्या हातावर, पाठीवर तसेच डाव्या पायावर दुखापत झाली आहे. घटनेमुळे विद्यार्थ्याला मानसिक धक्का बसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कलम ११८ (१) तसेच बाल न्याय (काळजी व संरक्षण) कायदा २०१५ मधील कलम ७५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित शिक्षकाने यापूर्वीही दोन वेळा विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला असून, वारंवार अपमानास्पद वागणूक दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पुढील तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे धाराशीवमध्ये वाढत असल्या गुन्हांमुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.