
30 हून अधिक घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या; पोलिसांनी पाठलाग करुन पकडले
धाराशिव : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोरटे दररोज नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्यांचे गुन्हे करणाऱ्या अट्टल आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच वाहने असा तब्बल ४५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
३० मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, अट्टल घरफोड्या आरोपी अजय श्रावण शिंदे हा सुंभा परिसरात आला आहे. या माहितीची तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली. पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला तसेच श्रावण जमनाशा शिंदे याला ताब्यात घेतले.
गुन्हे शाखेच्या कारवाईत घरफोडी प्रकरणांचा उलगडा
चौकशीदरम्यान सुरुवातीला आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मात्र, विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत अजय शिंदे याने जिल्ह्यातील बेंबळी, ढोकी, धाराशिव ग्रामीण, शिराढोण, मुरूम, लोहारा, वाशी, परंडा, येरमाळा आणि आनंदनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ३२ घरफोड्यांचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. चोरीच्या मालामधून त्याच्या वाट्याला आलेले सुमारे १८ तोळे सोने पोलिसांनी जप्त केले. तसेच चोरीचे काही सोने विकून मिळालेल्या पैशांतून आरोपीने एक ब्रेझा चारचाकी वाहन आणि एक नवीन बुलेट दुचाकी खरेदी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. या सर्व मालासह एकूण ४५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे तसेच शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
३२ घरफोड्यांची दिली कबुली
अटक करण्यात आलेल्या अजय श्रावण शिंदे याने बेंबळी, ढोकी, धाराशिव ग्रामीण, शिराढोण, मुरूम, लोहारा, वाशी, परंडा, येरमाळा आणि आनंदनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ३२ घरफोड्यांचे गुन्हे केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. या गुन्ह्यांमध्ये त्याच्या साथीदारांचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
ब्रेझा व बुलेटसह मुद्देमाल केली हस्तगत
पोलिसांनी आरोपीकडून सुमारे १८ तोळे सोने, चोरीच्या पैशांतून खरेदी केलेली ब्रेझा चारचाकी आणि नवीन बुलेट दुचाकी जप्त केली. या कारवाईत एकूण ४५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.