सौजन्य फोटो - सोशल मिडीया
छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील विहामांडवा येथून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानंतरही तिला वेळेत उपचार मिळाले नसल्याचा आरोप असून, अखेर महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. उपचाराचा खर्च करण्यास सासरच्या मंडळींनी नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, माहेरच्यांनी उपचाराचा खर्च करण्याची तयारी दर्शवूनही महिलेला वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह सासू-सासरे आणि नणंदेविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती उर्फ समीक्षा विशाल निंबाळकर असे मृत महिलेचे नाव आहे.
स्वाती उर्फ समीक्षा निंबाळकर या नऊ महिन्यांच्या गर्भवती होत्या. ६ सप्टेंबर रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर त्यांच्या पोटातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे तसेच गर्भातील बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळली गेल्याचे निदर्शनास आले. गर्भातील गुंतागुंत वाढत असल्याने डॉक्टरांनी तातडीने सिझेरियन करण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, उपचाराचा खर्च करण्यास सासरच्या मंडळींनी नकार दिल्याचा आरोप आहे.
स्वाती यांच्या माहेरच्या मंडळींनी उपचाराचा संपूर्ण खर्च करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्यानंतरही त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत गेल्यानंतर अखेर २५ सप्टेंबर रोजी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच स्वाती यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पोटातील नऊ महिन्यांचे बाळही दगावले. वेळेत वैद्यकीय उपचार मिळाले असते तर परिस्थिती वेगळी राहिली असती का, याबाबतही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणी पाचोड पोलिसांनी स्वाती यांचे पती विशाल अनिल निंबाळकर, सासरे अनिल निंबाळकर, सासू शारदा निंबाळकर आणि नणंद ऐश्वर्या निंबाळकर (सर्व रा. विहामांडवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्वाती यांना सासरच्या मंडळींकडून मानसिक किंवा शारीरिक त्रास दिला जात होता का, तसेच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास नेमका विलंब का झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणातील वैद्यकीय परिस्थिती आणि मृत्यूशी संबंधित बाबींचाही तपास केला जात आहे. या घटनेमुळे विहामांडवा परिसरासह पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.






