
'माझी दोन मुलं ड्रग्जच्या आहारी गेली, इतर मुलांचे...’; ड्रग्ज विक्रेत्यांवर कारवाईसाठी वडिलांची आर्त हाक
विश्वास गायकवाड यांचा अल्पवयीन मुलगा तनिष्क हा ड्रग्जच्या व्यसनाच्या आहारी गेला असल्याचे त्यांनी सांगितले. ड्रग्जच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. तब्बल १८ तास तो बेशुद्ध अवस्थेत होता. डॉक्टरांनी केलेल्या उपचारांमुळे त्याचे प्राण वाचल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. तनिष्कचा मोठा भाऊ प्रथम हादेखील व्यसनाच्या आहारी गेल्याचे गायकवाड यांचे म्हणणे आहे. आपल्या दोन्ही मुलांचे भविष्य धोक्यात आल्याने त्यांनी परिसरातील कथित ड्रग्ज विक्रीविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.
Crime News: भाईंदरच्या बारमध्ये पोलिसांचा छापा! २६ जण ताब्यात, तब्बल १० तरुणी …
दत्तनगर आणि आयरे रोड परिसरात खुलेआम ड्रग्ज विक्री होत असल्याचा आरोप विश्वास गायकवाड यांनी केला आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलांनाही अमली पदार्थ उपलब्ध करून दिले जात असल्याचा त्यांचा दावा आहे. ड्रग्ज कुठून आणले जातात, त्यांची विक्री कोण करते आणि कोणत्या ठिकाणी हे प्रकार सुरू आहेत, याबाबतची माहिती आपल्या मुलाने पोलिसांना दिल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
मात्र, वारंवार पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करूनही संबंधित ड्रग्ज विक्रेत्यांविरोधात ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आपल्या मुलांची झालेली अवस्था पाहून विश्वास गायकवाड यांनी इतर पालकांना सावध करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. “माझ्या मुलांसोबत जे घडले, ते इतर कोणत्याही पालकांच्या मुलांसोबत घडू नये,” अशी भावनिक मागणी त्यांनी केली आहे. ड्रग्ज विक्रेत्यांविरोधात कारवाई व्हावी, यासाठी अनेक दिवसांपासून पोलीस ठाण्याच्या चकरा मारत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कल्याण-डोंबिवली परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या आसपास अमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दत्तनगरमधील प्रकरणामुळे अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, शैक्षणिक संस्था आणि पालकांनी समन्वयाने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
विश्वास गायकवाड यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करून परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेणार, ड्रग्ज विक्रीच्या कथित जाळ्याचा तपास होणार का आणि व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या अल्पवयीन मुलांच्या पुनर्वसनासाठी कोणती पावले उचलली जाणार, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या गंभीर प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनीही लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले