पुण्यात एकाच दिवसात ४५५ मद्यधुंद चालकांवर 'ड्रंक अँड ड्राईव्ह'ची कारवाई
होळी आणि धुलीवंदनानिमित्त शहरात विविध ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले गेले होते. तरुणाई डीजेच्या तालात नाचत होती. रंगात बेभाहून होईन आनंद घेत असतानाच दुसरीकडे मद्यधुंद अवस्थेत काहीजन वाहने चालवित होते. यापार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी शहरातील विविध भागात नाकाबंदी केली. तसेच, अशा चालकांवर कारवाई केली.
मद्यप्राशन करून रस्त्यावर वाहने घेऊन येतात, ज्यामुळे भीषण अपघातांची शक्यता असते. त्यामुळेच यंदा विशेष मोहीम हाती घेतली होती. मंगळवारी दिवसभर आणि उशिरा रात्रीपर्यंत शहरातील प्रमुख चौक, महामार्ग व गर्दीच्या ३० ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून तपासणी केली. यादरम्यान ४५५ चालक मद्यधुंद अवस्थेत सापडले. नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या या बेशिस्त चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, या सर्वांवर न्यायालयात खटले भरले जाणार आहेत. त्यांना कठोर शासन व्हावे यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.
कारवाई केलेल्या सर्व व्यक्तींना आज, बुधवारी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयात बोलविण्यात आले होते. तेथे पोलीस अधिकाऱ्यांनी या सर्वांचे समुपदेशन केले. यांना जेलची शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.
पुणे, शहरात बेशिस्त वाहन चालकांसोबतच रस्त्यांवर कर्णकर्कश आवाज काढत घिरट्या घालणाऱ्या तसेच ‘फटाकफटाक’ आवज काढणाऱ्यांवर जोरदार कारवाई केली. या सायलेन्सरद्वारे ध्वनीप्रदूषण तसेच ज्येष्ठ नागरिक व लहान मुले घाबरतात. अशा बुलेटस्वारांना शहर वाहतूक पोलिसांनी दणका दिला. गेल्या काही दिवसांत राबविलेल्या विशेष मोहिमेत तब्बल २ हजार ८२२ वाहनांवर कारवाई केली असून, जप्त केलेल्या ९०० मॉडीफाय सायलेन्सरवर पोलिसांनी थेट बुलडोझर फिरवून ते निकामी केले.
अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव उपस्थित होते. शहर परिसरात विशेषतः तरुण वर्गात बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून जोरात आवाज काढण्याचे फॅड वाढले आहे. यामुळे रुग्णालय, शाळा आणि महाविद्यालयीन परिसरात ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत सातत्याने तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. याची दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार वाहतूक शाखेने शहरात व्यापक मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत एकूण २ हजार ८२२ वाहने दोषी आढळली असून, त्यापैकी ९०० मॉडीफाय सायलेन्सर पोलिसांनी घटनास्थळीच जप्त केले. या कारवाईतून आतापर्यंत २८ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरातील हडपसर, कोरेगाव पार्क, विमानतळ, डेक्कन, भारती विद्यापीठ यांसह प्रमुख भागांत हे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळले. पहिल्या गुन्ह्यासाठी १ हजार तर दुसऱ्या गुन्ह्यासाठी २ हजार रुपये दंड आकारला जात आहे. जप्त केलेले सायलेन्सर पुन्हा वापरात येऊ नयेत, यासाठी येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात त्यावर बुलडोझर चालवून त्यांचे तुकडे करण्यात आले. शहरात यापुढेही ही मोहीम अधिक तीव्रतेने सुरू राहणार असून बेशिस्त चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
… त्या गॅरेज चालकावर थेट गुन्हे
वाहनधारकांना मॉडीफाय सायलेन्सर बदलून देणाऱ्या गॅरेज चालकांवरही कारवाई केली जाणार आहे. अशा गॅरेज चालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे यावेळी वाहतूक विभागाने स्पष्ट केले.
…कारवाई दृष्टिक्षेपात
– एकूण कारवाई केलेली वाहने: २,८२२
– जप्त केलेले सायलेन्सर: ९००
– वसूल केलेला दंड: २८ लाख १७ हजार रुपये






