File Photo : Crime
उमरखेड : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील चुरमुरा येथील श्रीदत्त खांडी मंदिरात महानुभाव पंथाचे पुजारी म्हणून वास्तव्यास असलेले प्रमोद मुनी संन्याशी यांना शनिवारी (दि. 5) सकाळी दारूड्याने मारहाण केली. याप्रकरणी उमरखेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे.
हेदेखील वाचा : iPhone डिलरने चोरलेले मोबाईल ग्राहकांना विकले, ग्राहकांची फसवणूक तर पोलीसही चक्रावले
शेख फरीद शेख खाजा (रा. जाकीर हुसेन वार्ड, उमरखेड) असे आरोपीचे नाव आहे. चुरमुरा येथील महानुभाव पंथाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दत्तप्रभु (खांडी) मंदिरात पुजारी प्रमोद मुनी संन्याशी हे पुजेत व्यस्त असताना आरोपी शेख फरीद शेख खाजा हा मंदिराच्या परिसरात गेला व पुजारी यांना मंदिराबाहेर निघ, तू माझ्या बैल विक्रीचे पैसे समोरच्या व्यक्तीकडून देण्याबाबत मध्यस्थी केली होती. ते पैसे मला तू दे, असे म्हणून शिवीगाळ केली. तेव्हा पुजारी यांनी त्यास येथे पुजापाठ सुरु आहे, नंतर ये असे म्हटल्यानंतर शेख फरीद याचा पारा भडकला व त्याने पुजाऱ्याच्या डाव्या डोळ्यावर हाताने जबर ठोसा लगावला. त्यामुळे पुजारी प्रमोद मुनी यांच्या डोळ्याला जबर दुखापत झाली.
दरम्यान, पुजारी प्रमोद मुनी संन्याशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घटनेचा तपास पोलिस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार मोहन चाटे करत आहे. घटनेतील आरोपीने गुरुवारी (दि. 3) शहरातील वर्षा बारवर मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालून बारमालकास मारहाण केल्याप्रकरणी बारमालकाच्या फिर्यादीवरून उमरखेड पोलिस स्टेशनला सदर आरोपी विरुद्ध नुकताच अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे.
हेदेखील वाचा : कोचिंगमध्ये दोन विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी; एकमेकांवर चप्पलांचा वर्षाव, व्हिडिओ व्हायरल