सौजन्य - सोशल मिडीया
कुर्डुवाडी : पोलीस असल्याचे बतावणी करत एका मोटार सायकलस्वाराला अडवून तपासणीच्या नावाखाली सुमारे ९० हजार रुपये किमतीच्या ३० ग्रॅम सोन्यावर तोतया पोलीसाने हात साफ केला. ही घटना २८ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंबाड (ता. माढा) येथील पेट्रोलपंपाजवळ घडली आहे. याबाबत सुरेश मुरलीधर पाटील (वय-६९, रा.पिंपळनेर ता. माढा) यांनी अज्ञात इसमाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सुरेश पाटील हे पिंपळनेर येथील घरातून २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता मोटरसायकलवर भुताष्टे (ता. माढा) येथे चुलत मामा वारल्याने सावडण्याकरीता गेले होते. त्यानंतर सावडुन परत गावी जात असताना सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अंबाड येथील पेट्रोलपंपाजवळ पोहचले असता एक अनोळखी व्यक्ती काळ्या रंगाची युनिकॉर्न सारखी मोटरसायकल घेऊन फिर्यादी जवळ आला व मोटरसायकल थांबविण्यास सांगितली.
फिर्यादी थांबल्यानंतर अंगावर काळे रंगाचे जॅकेट व डोक्याला हेलमेट घातलेल्या अज्ञात इसमाने रात्री चोरी झाली आहे, मी पोलीस आहे, मला तुमची झडती घ्यायची आहे असे सांगितले. त्यामुळे तुमच्या जवळील पैसे व दागिने काढुन रुमालात ठेवा असे सांगितल्याने फिर्यादीने खिश्यातील रुमाल काढुन त्यामध्ये पाकीट, हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची चैन त्यामध्ये ठेवली. त्यावेळी त्याने रुमालास गाठ मारुन रुमाल हातात दिला व त्याने रुमाल घरी गेल्यानंतर उघडा असे सांगून तेथुन तो मोटर सायकलवरुन कुर्डुवाडीच्या दिशेने निघुन गेला.
त्यानंतर फिर्यादी घरी पोहोचल्यानंतर जवळील रुमाल उघडल्यानंतर त्यामध्ये सोन्याच्या वस्तू दिसल्या नाहीत फक्त पॉकेट दिसले. यावरून सोन्याची अंगठी व चैन आणि हातचलाखीने लंपास केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यात फिर्यादीची १० ग्रॅम सुमारे ३० हजार रुपयांची एक सोन्याची चैन,२० ग्रॅम दोन पिवळ्या सोन्याच्या अंगठ्या सुमारे ६० हजार रुपयांच्या अशे एकूण ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले आहेत. याबाबत अज्ञात इसमाविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार नितीन गोरे करीत आहेत.






