संग्रहित फोटो
पुणे / अक्षय फाटक : आयपीएल लीगमधील पंजाब किग्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यातील अंतिम सामना संपल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या विजयाचा जल्लोषासाठी एफसी रोडवर गुडलक चौकात जमल्यांतर हुल्लडबाजी करून तसेच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने वर्तन केल्याप्रकरणी 30 ते 40 तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे अधिनियम कलम 223, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1), 135, 111, 112/117 नुसार 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयानंतर तरुणांनी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल या पद्धतीने फटाके फोडले. तसेच सार्वजनिक ठिकाणावर येऊन गोंधळ घातला आणि अनुचित प्रकार घडेल अशा पध्दतीने बेजबाबदार वर्तन केले.
मंगळवारी रात्री आयपीएलच्या अंतिम सामना पंजाब किग्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात झाला. त्यात आरसीबीचा विजय झाला. त्यानंतर जल्लोष करण्यास हजारो तरुण रस्त्यावर उतरले आणि त्यांनी प्रचंड गर्दी जमवून गोंधळ घातला. एफसी रोडवरील गुडलक चौकात जमा झालेल्या या तरूणांनी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मोठ्या आवाजात फटाके फोडले. रस्त्यावर उभे राहून हुल्लडबाजी करत नागरिकांना व वाहनचालकांना अडथळा निर्माण करण्यात आला.
यावेळी काही जणांनी असभ्य वर्तन देखील केल्याचे पोलिसांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांकडून घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे असभ्य वर्तन करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. कायद्याचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे डेक्कन पोलिसांकडून सांगण्यात आले.
नेमकं काय घडलं?
विजयानंतर संपूर्ण चाहत्यांनी हा परिसर भरून गेला होता. अनेक वाहनांना चाहत्यांनी अडवलं नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने अक्षरश: हातात फटाके फोडायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर त्यावरून जाणाऱ्या बसेस आणि टेम्पो या वाहनांवर चढून सुद्धा चाहत्यांनी हुल्लडबाजी केली. सर्व घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.