सौजन्य - नवराष्ट्र टीम
धुळे : महाराष्ट्रात व धुळे जिल्ह्यात प्रथमच मिनी मोक्का अंतर्गत देवपुर पोलिस ठाण्यात दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे. धुळे शहरातील देवपूर पोलिस ठाण्याचे शोध पथक व तपासी अंमलदारांनी ही कामगिरी केली असून, भारतीय न्याय संहिता सन २०२३ अन्वये सुधारीत कलमान्वये किरकोळ संघटीत गुन्हे करणाऱ्या दोघा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
दोन आरोपींकडून इलेक्ट्रीक मोटार व बॅटरी असा ८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दरम्यान या नवीन कलमानुसार किरकोळ संघटीत गुन्हेगारांस १ ते ७ वर्ष इतक्या शिक्षेचे प्रयोजन आहे. या नवीन कलमान्वय गुन्हेगारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होईल व पोलीस विभागाचा गुन्हेगारांवर प्रतिबंध करणे सोपे होणार आहे.
देवपूरातील तुषार रघुनाथ वाळके यांच्या घराच्या कम्पाऊंडमधून अज्ञात चोरट्याने पाण्याची इलेक्ट्रीक मोटार लंपास केली. याप्रकरणी देवपूर पोलिसात भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास विश्वनाथ शिरसाट हे करीत होते.