निनाईदेवीसह काळंबादेवीच्या मंगळसुत्रांवर चोरट्यांचा डल्ला; 60 हजारांचा मुद्देमाल लंपास (File Photo : Theft)
कराड : तुळसण (ता.कराड) गावच्या हद्दीतील निनाईदेवीचे मंदिरात चोरट्यांनी गाभाऱ्याच्या दरवाज्याचे कडी कोयंडा उचकटून निनाईदेवी व काळंबादेवीच्या गळ्यातील मंगळसूत्रावर डल्ला मारला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये सुमारे 60 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.
याबाबतची फिर्याद विलास तुकाराम गुरव (रा. तुळसण, ता. कराड) यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तुळसण येथे निनाईदेवीचे मंदिर आहे. शुक्रवारी विलास गुरव हे नेहमीप्रमाणे मंदिर बंद करून कुलूप लावून जेवण करण्यासाठी घरी गेले. त्यानंतर शनिवारी पहाटे साडेपाच वाजता निनाई देवीच्या मंदिराचे मुख्य दरवाजाचे कुलूप उघडून मंदिरात गेले असता मंदिरातील पूर्वेकडील दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाचे कडी कोयंडा उचकटलेला दिसला.
तसेच मंदिरातील निनाई देवी व काळंबा देवीच्या मूर्तीचे गळ्यातील 14 ग्रॅम वजनाचे सुमारे साठ हजार रूपये किमतीचे मनीमंगळसूत्र व दोन हजार रूपये रोख असा एकूण 62 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सतिश जाधव तपास करीत आहेत.