संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारीच्या घटना थांबताना दिसत नाही. दररोज वेगवेगळ्या कारणामुळे खुनाच्या घटना घडत आहे. गुन्हेगारांच्या टोळ्यांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. पोलिसांकडूनही गुन्हेगारीला आळा घालण्याचे प्रयत्न सुरु असले तरीही घटना काही कमी होताना दिसत नाही. अशातच आता दसऱ्याच्या दिवशी पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दसऱ्याचा उत्साह सुरू असताना कोथरूड येथील जयभवानी नगर परिसरात वडिलांचाच मुलाने चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
किरकाेळ वादातून मुलाने हे कृत्य केले. आपल्या वृद्ध वडिलांवर त्याने चाकूने सपासप वार केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी मुलाला अटक केली. तानाजी पायगुडे (वय ७२, रा. जयभवानीनगर, पौड रस्ता, कोथरूड) असे खून झालेल्यांचे नाव आहे. या प्रकरणी मुलगा सचिन तानाजी पायगुडे (वय ३३) याला अटक केली आहे. याबाबत तानाजी यांची पत्नी सुमन (वय ६८) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पायगुडे कुटुंबीय हे कोथरूड येथील जयभवानीनगर भागातील चाळीत राहायला आहेत. पायगुडे यांचे बैठे घर आहे. गुरुवारी (२ ऑक्टोबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास तानाजी पायगुडे व त्यांचा मुलगा सचिन हे पोटमाळ्यावर होते. दसरा असल्याने पायगुडे कुटुंबीय घरात होते. तानाजी यांच्या डोळ्यात ओैषध टाकायचे होते. त्यांनी मुलगा सचिन याला टीव्ही बंद करण्यास सांगितले. या कारणावरुन सचिन आणि वडील तानाजी यांच्यात वाद झाला. वादातून सचिनने घरातील चाकूने वडील तानाजी यांचा गळा आणि चेहऱ्यावर वार केले. पोटमाळ्यावरील आरडाओरडा ऐकून तानाजी यांची पत्नी सुमन या पोटमाळ्यावर गेल्या. तेव्हा तानाजीे हे गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे त्यांनी पाहिले.
आरोपी सचिन घरातून पसार झाला होता. गंभीर जखमी अवस्थेतील तानाजी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेला आरोपी सचिन याला वडिलांचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.