मैत्रिणीसोबत बाहेर फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
पालघर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या मैत्रिणीसोबत फिरायला बाहेर पडलेल्या 19 वर्षीय तरुणीला सहा गुन्हेगारांनी धमकावून एका बंद पोस्ट ऑफिसमध्ये डांबून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली.
तलासरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गाजवळ 19 वर्षीय पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत उभी असताना दोन दुचाकीवरून सहा अनोळखी व्यक्ती तिथे आले. आरोपींनी पीडित तरुणी आणि तिच्या मैत्रिणीला धमकावून जवळच्याच एका ओसाड आणि बंद पोस्ट ऑफिसमध्ये जबरदस्तीने ओढून नेले. तिथे आरोपींनी आळीपाळीने त्या तरुणीवर बलात्कार केला.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाजवळील या भीषण घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि महिला संघटनांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. भविष्यात असे गुन्हे टाळण्यासाठी सर्व गुन्हेगारांना शक्य तितकी कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींना तुरुंगात लवकर पाठवले जाईल. आणि या प्रकरणात जलद कायदेशीर कारवाई सुनिश्चित केली जाईल.
पीडितेने दिली पोलिसांत तक्रार
या घटनेनंतर, पीडित तरुणीने हिंमत एकवटून तत्काळ तलासरी पोलिस ठाण्यात जाऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी सांगितली. पीडित तरुणीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, पालघर पोलिसांनी विशेष पथके तयार केली. जलद कारवाई करत, पोलिसांनी काही तासांतच सहा आरोपींपैकी तिघांना अटक केली, तर उर्वरित तीन फरार आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
दुसऱ्या एका घटनेत, मिरा-भाईंदर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी अत्याचार केल्याचा, तर अन्य तीन जणांनी तिला मानसिक त्रास देत धमकावल्याचा गंभीर प्रकार काशिमिरा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी सहा जणांविरोधात पोक्सोसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे.






