सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकशाहीत महत्वाचा आणि न्यायदानाचे काम करणाऱ्या स्तंभातील न्याय देणाऱ्या न्यायाधीशानेच जामीन देण्यासाठी पाच लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा येथे कारवाई करून जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय लक्ष्मणराव निकम, आनंद मोहन खरात (रा. खरातवस्ती, दहिवडी, ता. माण), किशोर संभाजी खरात (रा. वरळी मुंबई) आणि अन्य एक असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत एका २४ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीच्या वडिलांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे वडील सध्या न्यायायलायीन कोठडीत आहेत. दोन महिन्यांपासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तक्रादार तरुणीच्या वडिलांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्याकडे तो प्रलंबित आहे. तो जामीन अर्ज मंजूर करून तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी खासगी व्यक्ती किशोर व आनंद खरात यांनी न्यायाधीश निकम यांच्या सांगण्याप्रमाणे व त्यांच्यासाठी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. नंतर याबाबत तरुणीने याची तक्रार पुणे एसीबीकडे केली होती.
हे सुद्धा वाचा : भाजप आमदाराच्या मामाचा शेजाऱ्यानेच काढला काटा; कारणही आलं समोर
त्या अनुषंगाने ३ व ९ डिसेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता न्यायाधीश निकम यांनी किशोर व आनंद खरात यांच्याशी संगणमत करून तक्रारदार यांच्या वडिलांचा प्रलंबित जामीन अर्ज मंजूर करून तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी दोघांमार्फतीने पाच लाखांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दाखवली. तसेच ती रक्कम दोघांच्या माध्यमातून मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार न्यायाधीश निकम यांच्यासह चौघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपाधीक्षक अनिल कटके पुढील तपास करत आहेत.