संग्रहित फोटो
पुणे : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरात चारही भागात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यू झाला आहे. सदाशिव पेठेतील ना. सी. फडके चौक, पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग तसेच नगर रस्ता परिसरात या अपघाताच्या घटना घडल्या असून, याप्रकरणी त्या-त्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावतीत भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार विजय शंकर रेळेकर (वय ५५, रा. देवराई, स्वामी नारायण मंदिराजवळ, आंबेगाव) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत रेळेकर यांचे भाऊ गणेश (वय ५३, रा. गुरुराज सोसायटी, पद्मावती, पुणे-सातारा रस्ता) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, चालकावर गुन्हा नोंदविला आहे. दुचाकीस्वार विजय रेळेकर हे बुधवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरुन निघाले होते. पद्मावती परिसरातील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ त्यांची दुचाकी आली असताना भरधाव टेम्पोने त्यांना धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रेळेकर यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक फकीर तपास करत आहेत.
सदाशिव पेठेतील ना. सी. फडके चौकात कारच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. रुपचंद सदाशिव घोणे (वय ८०, रा. शाहू महाविद्यालय रस्ता, पर्वती) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याबाबत धोणे यांचा मुलगा चंद्रशेखर (वय ५०) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार रुपचंद बुधवारी रात्री आठच्या सुमारास ना. सी. फडके चौकातून पर्वतीकडे निघाले होते. यावेळी भरधाव कारने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या घोणे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक इस्माइल शेख तपास करत आहेत.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वडगाव उड्डाण पुलाजवळ सेवा रस्त्याच्या कडेला थांबलेल्या खासगी बसवर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार शुभम शुक्ला (वय ३६, रा. अलंकाकृती सोसायटी, बाणेर सूस रस्ता) यांचा मृत्यू झाला. सेवा रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतने बस लावून अपघातात जबाबदार ठरल्याप्रकरणी बसचालक दिगंबर बाळासाहेब शिंदे (वय ३२, रा. अप्पापाडा, मालाड, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रणिल मेस्त्री यांनी सिंहगड रस्ता पोलिसांत तक्रार दिली आहे. दुचाकीस्वार शुक्ला गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरु निघाले होते. वडगाव उड्डाणपुलाजवळ सेवा रस्त्यावर खासगी बस रस्त्याच्या कडेला लावली होती. अंधारात बसवर आदळून दुचाकीस्वार शुक्ला यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सागर पवार तपास करत आहेत.
नगर रस्त्यावर वाघोलीत वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. विठ्ठल बालाजी जमदाडे (वय ४६, रा. एसटी काॅलनी, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत जमदाडे यांची पत्नी सीमा (वय ३२) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.