श्रीनगरच्या बडगाममध्ये दोन वाहनांमध्ये भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू (फोटो सौजन्य: iStock)
बडगाम : मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा एका भरधाव डंपर आणि सुमो (प्रवासी वाहन) यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. वाटरवानी-बडगाम रिंग रोडवर हा अपघात झाला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.
स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथकेही घटनास्थळी पोहोचली. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून, मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आता या मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
हेदेखील वाचा : ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतला; ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरुवातीच्या माहितीनुसार, १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दुर्घटनेबाबत नायब राज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले, “बडगाममधील रस्ते अपघाताची माहिती मिळताच अत्यंत दुःख झाले. दुखित कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. यातील जखमी उपचार होऊन ते लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना करतो.”
मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही बडगाममधील अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. त्यांनी प्रशासनाला सर्व शक्य मदत देण्याचे आणि जखमींना त्वरित वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत. अपघाताच्या कारणाची सखोल चौकशी सुरू आहे.
श्रीनगरमध्ये पोलिस ठाण्यातच स्फोट
श्रीनगरमधील नौगाम पोलिस ठाण्यात मोठा स्फोट झाला. हा स्फोट शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास झाल्याची माहिती दिली जात आहे. यात सहा जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले. डझनभराहून अधिक वाहनांना आग लागली. या स्फोटामुळे जवळच्या घरांचेही मोठे नुकसान झाले आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या. हा स्फोट इतका मोठा की, आसपासच्या परिसरात याचा आवाज आला.






