संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येरवडा परिसरातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यानिमित्ताने येत असताना त्यांच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला एका रिक्षा चालकाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रिक्षाचालकावर मारहाणीसह सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना १५ फेब्रुवारीला रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान संगमवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी खडकी बाजार पोलीस वसाहतीत राहणाऱ्या ४० वर्षीय कर्मचाऱ्याने तक्रार दिली आहे. त्यावरून सुरेंद्र साहेबलाल यादव (वय ३०, रा. संगमवाडी, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार येरवडा वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १५ फेब्रुवारीला पुणे पोलिसांच्या तरंग या कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. त्यावेळी विमानतळ ते शिवाजीनगर या मार्गाने त्यांचा गाड्यांचा ताफा जाणार होता. त्या पार्श्वभमीवर संगमवाडी येथे वाहतूक शाखेचा बंदोबस्त नेमण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांचा ताफा जाण्यापूर्वी रिक्षाचालक त्या ठिकाणी रस्त्यावर रिक्षा उभी करून थांबला होता. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक पोलीस रस्त्यावरील वाहने बाजूला करण्यास सांगत होते. तक्रारदार यांनी रिक्षाचालकाला त्याची रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले असता, त्याचा आरोपीला राग आला. रिक्षाचालकाने तक्रारदाराला शिवीगाळ करून कानशिलात लगावली. त्यानंतर बराच काळ याठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान याप्रकरणी गुन्हा नोंद करुन येरवडा पोलिसांनी तपास केला आहे.
हे सुद्धा वाचा : हॉटेलचे बिल देण्यावरुन वाद; पुण्यात कंटेनर चालकाला चाकाखाली चिरडलं
वाहतूक पोलिसाला चप्पलेने मारहाण
राज्यात पोलिसांना मारहाण केल्याचे अनेक प्रकार उघडकीस येत असतात. गेल्या काही दिवसाखाली पुणे शहर पोलीस बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असताना हडपसर भागात मात्र, पदपथावर लावलेल्या दुचाकीवर कारवाई करताना वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला दोन महिलांनी धक्काबुक्की करून चप्पलेने मारहाण केल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बालिका सूर्यवंशी आणि संगीत लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार आजिनाथ आघाव यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; नदीपात्रातील रस्त्यावर ज्येष्ठ महिलेचे दागिने चोरले