
शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू
जळगाव : शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात होऊन नववीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उमाळा-कंडारी रस्त्यावर हा अपघात झाला. मृत विद्यार्थ्याचे नाव अर्जुन कोळी असून तो कंडारी येथील रहिवासी होता. या दुर्घटनेत रिक्षाचालकासह दहा विद्यार्थी जखमी झाले असून, काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन रिक्षा उमाळा-कंडारी मार्गावरून जात असताना अचानक भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता एवढी होती की रिक्षेतील विद्यार्थी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींमध्ये मृत अर्जुन कोळी याचा चुलत भाऊदेखील आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. इतर काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अर्जुनच्या मृत्यूची बातमी कंडारी गावात पोहोचताच हळहळ व्यक्त करण्यात आली. कोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावावर शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासानंतरच अपघातामागील नेमकी कारणे समोर येणार आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. रिक्षाचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्घटनेमुळे ग्रामीण भागात शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक, वाहनांची स्थिती आणि चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन होते का, याची तपासणी करण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.