
Maharashtra Breaking News Today 14.10.2026
14 Oct 2026 10:10 AM (IST)
Maval Indrayani Rice Price Hike Drought: पावसाने दीर्घ ओढ दिल्याने आणि एल निनोच्या (El Nino) संकटामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला असून, त्याचा थेट फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. मावळ तालुक्यातील प्रसिद्ध 'इंद्रायणी' तांदळाच्या दरात किलोमागे तब्बल २० रुपयांनी वाढ होण्याची दाट शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
मावळ तालुक्यातील साडेबारा हजार हेक्टर भातशेती क्षेत्रापैकी तब्बल ६५ ते ७० टक्के क्षेत्राला पावसाअभावी मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी जमिनीला मोठ्या भेगा पडल्या असून, काही ठिकाणी उभे पीक करपून गेले आहे. दरवर्षी ५०० ते ५५० टन होणारे इंद्रायणी भाताचे उत्पादन यंदा केवळ १५० ते २०० टनांवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
14 Oct 2026 10:02 AM (IST)
राज्यात सध्या दुष्काळाने भयानक रूप धारण केले असून, ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. ऐन हिवाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी महिलांच्या डोईवर हंडे आले आहेत, तर पाण्याचा थेंब नसल्याने आणि रोजगाराची साधने संपल्याने अनेक गावे ओस पडू लागली आहेत. पोटापाण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांचे शहरांकडे स्थलांतर सुरू झाले आहे.
राज्य सरकारने आतापर्यंत २६५ तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे, तर 'ट्रिगर २' (Trigger 2) अंतर्गत ४३ तालुके संकटात आहेत. या ४३ तालुक्यांपैकी आणखी काही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याबाबत आज अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
14 Oct 2026 09:40 AM (IST)
बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा चौथा दिवस आहे. या दिवशी देवी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. देवीच्या नऊ रुपांपैकी हे चौथे रुप मानले जाते. कुष्मांडा म्हणजे आपल्या दिव्य हास्याने सृष्टीची निर्मिती करणारी शक्ती. त्यामुळे माता कुष्मांडा यांना सृष्टीची आदीशक्ती, ऊर्जा आणि आरोग्य देणारी देवी म्हणून पूजलं जातं.
14 Oct 2026 09:30 AM (IST)
Mumbai News: फळा स्पष्ट दिसत नसल्याने अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक नेत्रोपचार उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि व्हिजन फाउंडेशन ऑफ इंडियाने यांच्या समन्वयाने ‘बाल दृष्टी’ हा वेगळ्या प्रकारचा पहिला उपक्रम सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. तीन वर्षाच्या कालावधीत महापालिकेच्या १२०० शाळांमधील तीन लाख विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमातून निश्चित करण्यात आले आहे.
14 Oct 2026 09:16 AM (IST)
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्णतेचा चांगलाच तडाखा बसत आहे. मात्र, आता ‘ऑक्टोबर हिट’मुळे वाढलेला उकाडा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातील हवामानाची स्थिती आणि दक्षिण भारतात ईशान्य मॉन्सूनच्या पावसासाठी अनुकूल होत असलेल्या वातावरणामुळे राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे.
14 Oct 2026 09:05 AM (IST)
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, या निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रा. सचिन सानप यांना शिवसेनेचा (शिंदे गट) पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शासकीय निवासस्थान असलेल्या 'नंदनवन' येथे पार पडत असलेल्या बैठकीमध्ये प्रा. सचिन सानप यांच्या नावावर आणि त्यांना पाठिंबा देण्याबाबत गांभीर्याने चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सचिन सानप हे स्वतः एक प्राध्यापक असून, ते गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने शिक्षकांचे विविध प्रश्न आणि त्यांच्या अडीअडचणी लावून धरत आहेत.
Maharashtra to World Breaking News :
दिल्ली पोलिसांनी CJP चे सहसंयोजक सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना जंतर-मंतर परिसराचे कुंपण ओलांडून आत घुसल्यामुळे आणि घोषणाबाजी केल्यामुळे अटक केली आहे. दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात प्रवेशावर बंदी असतानाही बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी पक्षाच्या तीन प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल आणि महिला फलंदाज शिफाली वर्मा यांना सप्टेंबर २०२६ महिन्यासाठीचा ‘ICC प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर झाला. ‘SIR’ प्रक्रियेतील त्रुटी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून ‘इंडिया’ आघाडीचे दिल्लीतील आंदोलन तीव्र झाले आहे.
यूपीआय (UPI) वर ₹२००० पेक्षा जास्त व्यापारी व्यवहारांवर लागू होणारा मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) नियम दिवाळीनंतर लागू करण्याचा एनपीसीआयचा (NPCI) महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी ऑक्टोबर हीटचा तडाखा कायम असून कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत आहे.