दरम्यान पीडित तरुणी या महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होती. तिथेच लॅब असिस्टंट म्हणून कार्यरत असलेला तौफिक निसार ठाणगे याने तिच्याशी ओळख वाढवली. ओळखीतून जवळीक निर्माण करून त्याने विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने तिच्यासोबत हिंदू रितीरिवाजाप्रमाणे सात फेरे घेतल्याचे भासवून सांकेतिक विवाह केला. मात्र, तौफिक आधीपासूनच विवाहित असून त्याला चार मुले असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर, आरोपीने पीडित तरुणीवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिला बुरखा घालण्याची आणि नमाज पठण करण्याची सक्ती करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. आपली फसवणूक झाल्याचे आणि ‘लव्ह ट्रॅप’मध्ये अडकल्याचे लक्षात येताच विद्यार्थिनीने पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून, सुरुवातीला 19 मार्च रोजी ठाणे येथील मध्यवर्ती रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये ‘झिरो एफआयआर’ दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा पुढील तपासासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी तौफिक ठाणगे याला नेरळ ममदापूर येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. आरोपीने यापूर्वीही इतर मुलींना अशाच प्रकारे आपल्या जाळ्यात ओढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे नेरळ परिसरात आणि महाविद्यालयीन वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच विद्यार्थिनींची अशी फसवणूक आणि शोषण होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. इतक्या गंभीर घटना घडत असून देखील प्राचार्य मात्र मूग गिळून गप्प का असा सवाल उपस्थित केला असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.






