भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरातून ४ लाख पळविले (संग्रहित फोटो)
वर्धा : पुलगावमध्ये वाढत्या चोरीच्या घटना पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे. काही महिन्यांपूर्वी हरिराम नगर येथील एका ज्वेलर्सच्या दुकानात झालेल्या चोरीच्या घटनेत लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली. असे असताना आता चक्क भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्या घरी चोरी झाल्याचे गुरुवारी (दि. २१) उघडकीस आले.
गाते यांच्या घरातून चोरट्यांनी चार लाखांची रोख लंपास केली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. संजय गाते यांच्या पुलगाव येथील निवासस्थानाला चोरट्यांनी टार्गेट केले. मध्यरात्री चोरट्यांनी गाते यांच्या घरात प्रवेश करून चार लाखांची रोकड चोरून नेली. पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे काही देयक त्यांना अदा करायचे होते. त्यासाठी त्यांनी ही रोख घरी ठेवली होती. रात्री गाते कुटुंबातील गाढ झोपेत असताना चोराने मागच्या दारातून घरात प्रवेश करून कपाटातील रोख चोरून नेली.
दरम्यान, पहाटे संजय गाते यांच्या मुलीला जाग आली. तेव्हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पुलगाव पोलिसांकडे तक्रार सादर करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून बारकाईने पाहणी केली. शिवाय घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. विशेष म्हणजे ज्या कपाटातून चोरट्यांनी रोख चोरून नेली त्याच कपाटात सोन्याचे दागिनेही होते, पण ते त्याच्या नजरेतून सुटले.
पुण्यात मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांची चोरी
दुसऱ्या एका घटनेत, पुण्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. चोरी, हत्या, हाणामारी अशा अनेक प्रकारचे गुन्हे उघडकीस आले आहे. आता पुण्यातील सहकारनगर परिसरातून चोरीची एक घटना समोर आली आहे. मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी चोरी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी चोरट्याकडून एक दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त केली आहे. अल्पवयीनाला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. वारजे भागातील रामनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली.