
Crime News: ‘मंत्रजपाने आजार बरा करते’ म्हणत घरात शिरली; ओढणी उघडताच ७० वर्षीय आजीला बसला मोठा धक्का!
मुंबई : मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एका ७० वर्षीय महिलेची मंत्रजपाच्या बहाण्याने फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुलसुमबी काझी या दूध घेऊन घरी परतत असताना एका अनोळखी तरुणीने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर घरात शिरून बहिणीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आल्याचे सांगत तिने महिलेचा विश्वास संपादन केला.
कुलसुमबी यांच्याशी संवाद साधताना तरुणीने त्यांची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले. तसेच आपल्याला मंत्रजपाच्या माध्यमातून आजारपण बरे करता येते, असा दावा केला. त्यानंतर मंत्रजपाचा बहाणा करत तिने महिलेच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन्ही कानांतील दागिने काढून घेतले. त्यानंतर घरातील तांदूळ आणून त्या दागिन्यांवर ठेवले आणि काही मंत्र पुटपुटल्याचे नाटक केले. सर्व दागिने एका ओढणीत बांधून ही ओढणी काही तास उघडू नका, असा सल्ला तिने दिला.
‘दोन-तीन तासांत तुम्हाला आजारातून फरक जाणवेल. तोपर्यंत ओढणी उघडू नका, मी पुन्हा येते,’ असे सांगून तरुणी घरातून निघून गेली. मात्र अनेक तास उलटूनही ती परतली नाही. संशय आल्याने कुलसुमबी यांनी ओढणी उघडून पाहिली असता त्यातील दागिने गायब असल्याचे लक्षात आले. परिसरात शोध घेऊनही तरुणीचा ठावठिकाणा लागला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
अँटॉप हिल पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित तरुणीचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, मानखुर्द परिसरात गेल्या महिन्यात ६५ वर्षीय वृद्ध महिलेसोबतही अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे अँटॉप हिलमधील घटनेमागेही त्याच प्रकारे गुन्हे करणाऱ्या टोळीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.