मुंबईत घातपाताचा कट; दिल्ली पोलिसांकडून आयसिसचे दोन दहशतवादी अटकेत
New Delhi : दिल्ली पोलिस दलातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि केंद्रीय एजन्सींच्या पथकाने ISIS च्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. आयसिसशी संबंध असलेल्या आफताब आणि सूफियान या दोन दहशतवाद्यांचा मुंबईत घातपाताचा कट होता. मात्र, त्यांच्या योजना उधळून लावत पोलिसांनी त्यांना दिल्ली रेल्वे स्टेशनवरूनच ताब्यात घेतलं.
आफताब आणि सूफियान हे दोघेही मुंबईत राहणारे आहेत. मुंबईत दहशतावादी कारवाई कऱण्यासाठी त्यांनी हरियाणातील मेवात परिसरातून स्फोटके आणि शस्त्रास्त्रांची खरेदी केली होती. मुंबईत मोठ्या प्रमाणात दहशत पसरवण्याचा आणि दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा डाव होता. पोलिसांनी दोघांकडून ३ पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे संभाव्य दहशतवादी हल्ला टळल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट जारी, पुढील चार दिवस…
आयसिसशी संबंधित मुंबईतील आफताब आणि सुफियान या दोघा दहशतवाद्यांच्या अटकेनंतर चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे दोघेही मुंबईचे रहिवासी असून त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवर स्पेशल सेलने छापे टाकले. या छाप्यात पोलिसांनी शस्त्रास्त्रांसोबत ID बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. सर्व संशयित दहशतवादी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे दोघेही पाकिस्तानस्थित हँडलर्सच्या संपर्कात होते.या कारवाईनंतर पोलिसांना मुंबईत मोठ्या प्रमाणात घातपाताचा कट उधळण्यात यश मिळाले असून पुढील चौकशी सुरू आहे.
दुसरीकडे या कारवाईशी संबंधित आणथी तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडूनही आयईडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये दोन जण दिल्लीचे, तर प्रत्येकी एक मध्य प्रदेश, तेलंगणातील हैदराबाद आणि झारखंडमधील रांची येथील आहे. अटक केलेल्या पाच दहशतवाद्यांची नावे अशर दानिश, सुफियान अबुबकर खान, आफताब अन्सारी, हुजैफा यमन आणि कामरान कुरेशी अशी आहेत. या कारवाईमुळे संपूर्ण भारतातील दहशतवादी नेटवर्क उघडकीस आल्याचे असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले आहे.
भारतात खिलाफत स्थापन करण्यासाठी एक जिहादी लष्कर तयार केले जात होते. यासाठी इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि फेसबुकवर दहशतवादी मॉड्यूल सक्रिय होते. जिथून तरुणांचे ब्रेनवॉशिंग करून देशात दहशत निर्माण करण्याचे कट रचले जात होते. स्पेशल सेलने ५ दहशतवाद्यांना अटक केली आहे. सूत्रधार अशर दानिशकडून शस्त्रे बनवण्याचे साहित्य, दारूगोळ्याचे भाग आणि ‘खिलाफत’ स्थापन करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका नव्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला असून त्याचे सदस्य दिल्ली, रांची, ठाणे, निजामाबाद आणि राजगड येथे ओळखले गेले आहेत, असे अतिरिक्त पोलिस आयुक्त (सीपी) पी. एस. कुशवाह यांनी सांगितले. या संघटनेचे सदस्य स्फोटके तयार करण्याचे तसेच आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण घेत होते. त्याचबरोबर ते दिल्ली/एनसीआरमार्गे शस्त्रे खरेदी करण्याचे प्रयत्न करत होते आणि विविध दुकानांमधून तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे आयईडीसाठी लागणारी रसायने विकत घेण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे,
स्पेशल सेल आणि केंद्रिय एजन्सी संयुक्तपणे या मॉड्यूलशी संबंधित चौकशी करत आहेत. तपासादरम्यान ज्या ठिकाणी छापे टाकले गेले तिथून शस्त्रसाहित्य, रसायने आणि इलेक्ट्रॉनिक साधने तसेच डिजिटल पुरावे जप्त करण्यात येत आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या मॉड्यूलचा उद्देश मोठ्या प्रमाणात हल्ले घडवणे हा असल्याचे संशय आहे आणि पुढील तपास सुरू आहे.