सौजन्य फोटो - टीम नवराष्ट्र
पोलिसांना पाहताच पळण्याचा प्रयत्न
बुधवारी सकाळी सुमारे ११.४१ वाजता मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याकडून मुंबईच्या दिशेने एक दुचाकीस्वार भरधाव वेगाने जात होता. त्याच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पळस्पे महामार्ग पोलिसांच्या पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहताच त्याने दुचाकीचा वेग वाढवून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने त्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतर पाठलाग केल्यानंतर आदई ब्रिजजवळ शोल्डर लेनमध्ये पोलिसांनी दुचाकीस्वाराला घेरले आणि त्याला अडवण्यात यश मिळविले.
कागदपत्रांबाबत उडवाउडवीची उत्तरे
ताब्यात घेतलेल्या दुचाकीस्वाराची चौकशी केली असता त्याने आपले नाव अरविंद हिरासिंग अडे (वय २७, रा. सांताक्रुज, मुंबई; मूळ रा. यवतमाळ) असल्याचे सांगितले. पोलिसांनी दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता तो समाधानकारक माहिती देऊ शकला नाही. त्याच्या संशयास्पद हालचाली आणि उडवाउडवीच्या उत्तरांमुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.
ई-चालानवर दुचाकीचा तपशील तपासला
पोलिस अंमलदारांनी ई-चालान मशिनच्या माध्यमातून दुचाकीच्या क्रमांकाची माहिती तपासली. या तपासात दुचाकी धारावी येथील राधेश्याम विश्वकर्मा यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. तसेच ही दुचाकी सायन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेली असून, याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले.
आरोपी सायन पोलिसांच्या ताब्यात
चोरीची दुचाकी जप्त करून आरोपी अरविंद अडे याला पुढील तपासासाठी सायन पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सायन पोलीस करत आहेत. महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक त्रिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पळस्पे केंद्राचे प्रभारी अधिकारी देवीदास नाईक, ड्युटी अधिकारी केदार कुंभार, पोलीस अंमलदार निलेश चव्हाण, संजयसिंग ठाकूर, प्रकाश म्हात्रे आणि ठाणे अंमलदार मच्छिंद्र जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. ई-चालान मशिनच्या माध्यमातून वाहनाची माहिती तपासल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला.






