सौजन्य फोटो - सोशल मिडीया
सातारा : फलटणमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अंगात भूत शिरल्याची बतावणी करून अघोरी विधी केल्याचा आणि त्यानंतर तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फलटण शहर पोलिसांनी संशयित आरोपी सौरभ नाना मदने याला अटक केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात पोक्सो कायदा आणि जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयिताने अल्पवयीन मुलीच्या अंगात भूत असल्याचे भासवून तिच्यावर अघोरी विधी केल्याचा आरोप आहे. यासाठी बाहुली, लिंबू आणि चामडी गोफणीचा वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. या कथित विधीनंतर पीडितेला एका निर्जन ठिकाणी नेण्यात आले आणि तेथे तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर फलटण शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांनी या प्रकरणात आरोपीविरोधातील खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. प्रकरणाचा तपास गांभीर्याने करण्यात येत असून उपलब्ध पुरावे आणि संबंधित बाबींची चौकशी केली जात आहे.
दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या घराबाहेर अघोरी विद्या केल्याचे भासवणारे साहित्य ठेवण्यात आले असून जीवे मारण्याची धमकी देणारे पत्रही आढळल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच धमकीच्या पत्राच्या प्रकाराचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. पोलिसांकडून या सर्व बाबींची चौकशी सुरू आहे.






