चिपरीतील तरुणाच्या खूनाचा लागला छडा; तीन आरोपींना सापळा रचून पकडले
जयसिंगपूर : राज्यात गुन्हेगारी वाढली आहेत. राज्यातील वेगवेगऴ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना दररोज उघडकीस येत असतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत. मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांनादेखील यश मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अशातच आता जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. चिपरी (ता. शिरोळ) येथे तरुणाचा निघृण खुन केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केवळ सहा तासांत तिन्ही आरोपींना चिक्कोडी (जि. बेळगाव, कर्नाटक) येथून शिताफीने अटक केली आहे.
दिनांक ६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास चिपरी गावात घोडावत गेस्ट हाऊस व ऑईल मिलच्या दरम्यान रस्त्यावर संदेश लक्ष्मण शेळके (रा. माळभाग, चिपरी) याचा अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी त्याचे काका भगवान अण्णा शेळके यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित चिक्कोडी येथे असल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शोध पथकाने तत्काळ तेथे धाव घेत सापळा रचला.
युवराज रावसाहेब माळी (वय ३०, रा. फिल्टर हाऊसजवळ, चिपरी), सुरज बाबासो ढाले (वय ३०, मूळ गाव खोची, ता. हातकणंगले) गणेश संभाजी माळी (वय २५, रा. माळभाग, चिपरी) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संशयित आरोपी युवराज माळी याने मयत शेळके यांच्या बहिणीने माळी याच्या आईला अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून संदेश याचा कोयत्याने वार करून खून केल्याची कबुली दिली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, सहायक पोलीस निरिक्षक दीपक कदम, प्रवीण माने, युनुस इनामदार, किशोर अंबुडकर, निलेश मांजरे, ताहीर मुल्ला, रहिमान शेख, बाळासाहेब गुत्ते कोळी, रुपेश कोळी, जावेद पठाण यांनी केला.
फलटणमधील संतापजनक प्रकार
फलटण शहरातील उपनगरात राहत असलेल्या एका केवळ ९ वर्षाच्या चिमुरडीला तिच्या सख्ख्या मामाने अमानुषपणे मारहाण केली असून, या मारहाणीमुळे संबंधित चिमुरडीच्या मनावर आघात झाला आहे. घडलेला मारहाणीचा प्रकार चिमुरडीने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आहे. दरम्यान, मामाच्या विरोधात चिमुरडीचे पिता फलटण शहर पोलिस ठाण्यात गेले असता शहर पोलिसांनी अक्षरश: त्यांना हाकलून लावले. शेवटी हतबल झालेल्या पित्याने सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे धाव घेवून तक्रार मांडली आहे.