सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : वाघोलीतील न्याती एलान सेंट्रल साऊथ सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर दोन कारमध्ये बेकायदा रेसिंग झाल्याचा प्रकार घडला आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. कार चालकांना अडवल्यानंतर संबंधित चालक तरुणांनी स्थानिक नागरिकांना अरेरावी करीत हुज्जत देखील घातली. दोन्ही कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
वाघोली वाहतूक विभागाने मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई परिमंडळ चारचे उपायुक्त हिंमक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज हांडे, उपनिरीक्षक मनोज बागल आणि वाहतूक विभागाचे प्रभारी सहायक निरीक्षक गजानन जाधव यांनी केली. कार रेसिंगचा प्रकार आणि त्यानंतर कारचालकांनी केलेल्या अरेरावीमुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले होते. या प्रकारामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भावना नागरिकांची होती. पोलिसांच्या त्वरित आणि कठोर कारवाईने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
एका तरूणाकडे कार चालविण्याचा शिकाऊ परवाना
सोसायटीच्या जवळ एका खासगी संस्थेचे महाविद्यालय आहे. संबंधित तरूण या महाविद्यालयात शिकतात. तर, कारचे रेसिंग केलेला रस्ता दोन सोसायट्यांमधील रस्ता आहे. कारवाई झालेल्या दोन तरुणांपैकी एकाकडे कार चालविण्याचा शिकाऊ परवाना आहे, अशी माहिती उपनिरीक्षक मनोज बागल यांनी दिली.