तडीपार गुंडाकडून शस्त्र जप्त (फोटो- istockphoto)
पुणे: शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला जेरबंदकरून भारती विद्यापीठ पोलिसांनी देशी बनावटीच्या पिस्तुल, मेफेड्रोन आणि कोयता जप्त केला. कात्रज भागात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुंडाबरोबर असलेल्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. तौसिफ अमिर सय्यद उर्फ चुहा (वय २८, रा. संतोषनगर, कात्रज) त्याचे साथीदार सूरज राजेंद्र जाधव (वय ३५, रा. रुपचंद तालीमसमोर, करमाळा, जि. सोलापूर), मार्कस डेव्हीड इसार (वय २९, रा. गगनगिरी मंगल कार्यालयाजवळ, धानोरी, विश्रांतवाडी), कुणाल कमलेश जाधव (वय २५, रा. प्रसाद रेसीडन्सी, सोमनाथनगर, वडगाव शेरी ) यांना अटक करण्यात आली. तर त्यांच्याबरोबर असलेला साथीदार जनाब (रा. लष्कर) पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस शिपाई धनाजी धोत्रे यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर व त्यांच्या पथकाने केली आहे. तौसिफ सय्यद याच्यावर गंभीर स्वरुपाचे गु्न्हे दाखल आहेत. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. सय्यदला गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले होते.
सय्यद आणि साथीदार कात्रज भागात दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संतोषनगर परिसरात सापळा लावला. तसेच, छापा कारवाई करून त्याला पकडले. त्याच्याबरोबर असलेले साथीदार जाधव, इसार, जाधव यांना ताब्यात घेतले. तर, साथीदार जनाब पसार झाला. सय्यद याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस, मेफेड्रोन, वजन काटा, स्क्रू ड्रायव्हर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक मोहन कळमकर हे करत आहेत.
हेही वाचा: कोथरूड हादरलं! धारदार हत्याराने तरूणावर हल्ला; नेमकं कारण तरी काय?
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यात दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिकांसोबतचं पोलिसही हैराण झाले आहेत. अशातच आता जुन्या वादातून तिघांनी एका तरुणावर धारदार हत्याराने हल्ला केल्याचा प्रकार कोथरूडमध्ये घडला आहे. टोळक्याने तरुणाच्या डोक्यात, कानाजवळ आणि दोन्ही तळहातावर हत्याराने वार केल्याने तो यात गंभीर जखमी झाला आहे. शास्त्रीनगर येथील कैलास मित्र मंडळाजवळ राहणाऱ्या दिनेश संदिप भालेराव (वय २७) हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्यानूसार, कोथरूड पोलिसांनी उदय थोरात (वय १८), निखिल थोरात (वय २१) आणि अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २४ नोव्हंबरला रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार व आरोपी सर्व एकाच परिसरात राहतात. ते एकमेकांना आधीपासून ओळखतात. त्यांच्यात वादही आहेत. घटनेच्या दिवशी तक्रारदार तरूण कैलास मित्र मंडळाजवळील कट्ट्यावर बसला होता. आरोपी उदय थोरातने तक्रारदाराला पाहिल्यावर इतर आरोपींना बोलावून घेतले. जुन्या वादाच्या रागातून आरोपींनी तक्रारदाराला शिवीगाळ केली. तेव्हा तक्रारदार तेथून निघून जात असताना, आरोपी थोरात यांनी आणलेल्या हत्याराने तक्रारदाराच्या डोक्यात, कानाजवळ आणि दोन्ही तळहातांवर घाव घातले. त्यात तक्रारदार गंभीर जखमी झाला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप देशमाने आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.