हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड (photo Credit- X)
हा संपूर्ण प्रकार पुण्याच्या मिहिर गहुकर आणि त्याच्या मित्रासोबत घडला. रात्रीचे साधारण ३ वाजले होते, मिहिर आणि त्याचा मित्र गप्पा मारण्यासाठी बाल्कनीत गेले होते. मात्र, अचानक बाल्कनीचा दरवाजा बाहेरून लॉक झाला आणि दोघेही तिथेच अडकले. घराच्या आत मिहिरचे आई-वडील गाढ झोपेत होते. जर त्यांनी आरडाओरडा केला असता, तर पालकांची झोप मोड झाली असती आणि रात्री उशिरापर्यंत जागल्याबद्दल त्यांना ओरडा पडला असता. याच भीतीने दोघांनी शांत राहण्याचे ठरवले.
बाल्कनीत अडकलेल्या मिहिरला अचानक एक कल्पना सुचली. त्याने लगेच आपल्या मोबाईलमधील ‘ब्लिंकिट’ ॲप उघडले आणि काही किरकोळ सामानाची ऑर्डर दिली. त्याचा उद्देश वस्तू मागवणे हा नसून, एका अशा माणसाला घरापर्यंत बोलावणे होता जो बाहेरून येऊन त्यांची मदत करू शकेल. अवघ्या काही मिनिटांतच एक डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन इमारतीखाली पोहोचला.
मिहिरने बाल्कनीतूनच डिलिव्हरी बॉयला इशारा करून आपली अडचण सांगितली. मिहिरने त्याला हळू आवाजात समजावले की, घराचा मुख्य दरवाजा बाहेरून कसा उघडायचा आणि कोणालाही न उठवता त्यांना बाल्कनीतून बाहेर कसे काढायचे. त्या डिलिव्हरी बॉयनेही कमालीची चतुराई दाखवली. त्याने कोणताही आवाज न करता फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि बाल्कनीचा दरवाजा उघडून दोन्ही मित्रांची सुटका केली.
मिहिरने या अनोख्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर (@mihteeor) शेअर केला आहे, जो अवघ्या काही तासांत तुफान व्हायरल झाला. यावर ब्लिंकिट कंपनीने स्वतः मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटले की, “हे फक्त पुण्यातच घडू शकते!” नेटकऱ्यांनीही यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.
Yuck! हातावर तंदुरी रोटी घेतली अन् त्यावर थुंकला, कुकचा किळसवाणा Video Viral, पोलिसांनी केली अटक






