Bhima River Pollution: भीमा नदी संकटात! राजगुरुनगर परिसरात प्रदूषणाचा वाढला कहर (फोटो-सोशल मीडिया)
Bhima River Pollution: महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात वाहणारी भीमा नदी ही लाखो नागरिकांच्या जीवनाशी थेट जोडलेली आहे. मात्र, दुर्दैवाची बाब म्हणजे आज हीच भीमा नदी आपल्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे. विशेषतः राजगुरुनगर शहर व परिसरात भीमा नदीची अवस्था अत्यंत विदारक झाली आहे. भीमा नदी हजारो वर्षांपासून परिसरातील शेती, पशुधन, पिण्याचे पाणी, भूजल पुनर्भरण आणि जैवविविधतेचा कणा राहिली आहे. नदीकाठची जमीन सुपीक राहण्यामागे भीमेचा मोठा वाटा आहे. अनेक गावांची अर्थव्यवस्था, मासेमारी, शेती आणि पूरक व्यवसाय या नदीवर अवलंबून आहेत. नदी हे नैसर्गिक परिसंस्थेचे केंद्र असून, जलचर, पक्षी, वनस्पती आणि मानव यांचे सहअस्तित्व नदीमुळेच शक्य होते.
हेही वाचा: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
राजगुरुनगर शहरातील घरगुती सांडपाणी, व्यापारी आस्थापनांचे सांडपाणी तसेच आजूबाजूच्या गावांमधील मलनिस्सारणाचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जात आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) अस्तित्वात असतानाही ते अकार्यक्षम किंवा अपुरे ठरत आहेत, ही गंभीर बाब आहे. नदीच्या पाण्यावर हिरवट तवंग पसरलेला दिसून येत असून, पाण्यातील पोषक द्रव्यांच्या अतिरेकामुळे जलपर्णी वाढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही जलपर्णी नदीच्या प्रवाहाला अडथळा आणते, सूर्यप्रकाश रोखते आणि पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी करते. परिणामी नदी मृतप्राय होण्याच्या मार्गावर आहे. पाण्यातील ऑक्सिजन कमी झाल्याने मासे, खेकडे, कासवे व इतर जलचरांचे जीवन गंभीर धोक्यात आले आहे. मासे मरत असल्याच्या घटना अधूनमधून घडत असून, संपूर्ण जैवसाखळी विस्कळीत होत आहे.
हेही वाचा: PCMC Politics : वडिलांच्या विरोधात मुलगा निवडणुकीच्या रिंगणात! बंडखोर पुत्रामुळे भाजपला डोकेदुखी
पक्षी, प्राणी आणि नदीवर अवलंबून असलेली इतर सजीवसृष्टी यांच्यावर याचा परिणाम होत आहे. पर्यावरणीय असमतोल वाढत चालला आहे. भीमा नदीवर उदरनिर्वाह करणाऱ्या मासेमारी व्यावसायिकांवर या प्रदूषणाचा थेट परिणाम होत आहे. दूषित पाण्यात मासेमारी करताना त्वचारोग, संसर्गजन्य आजार, श्वसनाचे विकार वाढत आहेत. मासे दुषित असल्याने त्यांची विक्री घटत असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव, पोटाचे विकार, त्वचारोग, तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरही परिणाम जाणवू लागला आहे. भूजलही हळूहळू दुषित होत असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या पंधरा वर्षांत भीमा नदीचे स्वरूप पूर्णतः बदलले आहे. एकेकाळी स्वच्छ, वाहती व जीवनदायिनी असलेली नदी आज काळ्या-हिरव्या पाण्याने भरलेली दिसते. नदीकाठची घनदाट हिरवळ नष्ट होत चालली असून, नदी हा प्रश्न बनत चालला आहे.
जर तातडीने ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर भीमा नदी कायमची मृतप्राय होण्याचा धोका आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे, थेट सांडपाणी सोडणाऱ्यावर कठोर कारवाई करणे, औद्योगिक व नागरी सांडपाण्यावर सतत देखरेख ठेवणे आणि नदी पुनरुज्जीवनासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करणे, ही काळाची गरज आहे. भिमा नदी वाचवणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संघटना आणि प्रशासन यांची सामूहिक जबाबदारी आहे.






