"तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय", पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात (Photo Credit- X)
सत्ताधारी तीन पक्षांच्या कारभारामुळे शहरात भ्रष्टाचार
यावेळी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. सत्ताधारी तीन पक्षांच्या कारभारामुळे शहरात भ्रष्टाचार वाढला असून उद्योग, वाहतूक व पर्यावरणाच्या समस्या गंभीर झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री व पुण्याचे प्रभारी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद झाली. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी महापौर प्रशांत जगताप, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, शहर युवक अध्यक्ष सौरभ अमराळे आदी उपस्थित होते.
चव्हाणांची सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका
पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका करताना सांगितले की, पुण्यात उद्योगांसाठी अनुकूल वातावरण राहिलेले नाही. वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि ढासळलेल्या नागरी सुविधांमुळे उद्योग शहराबाहेर जात आहेत, तर नवीन गुंतवणूक पुण्याकडे वळत नाही. “राज्य सरकारकडून मोठ्या गुंतवणूक घोषणांचा गाजावाजा केला जातो; मात्र प्रत्यक्षात ठोस गुंतवणूक दिसत नाही,” असे त्यांनी नमूद केले. नागरी सुविधा अपुऱ्या असल्याने सेमीकंडक्टरसारखे अत्याधुनिक उद्योग पुण्यात येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
योजना चुकीच्या पद्धतीने राबवल्या तर भ्रष्टाचार वाढतो
मेट्रो प्रकल्पाबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, आपण मुख्यमंत्री असताना मुंबई, पुणे व नागपूरमध्ये मेट्रो आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्याचे कागदोपत्री पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे श्रेयवाद टाळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “घोषणा करायला पैसे लागत नाहीत; मात्र योजना चुकीच्या पद्धतीने राबवल्या तर भ्रष्टाचार वाढतो,” असा आरोपही त्यांनी केला. स्मार्ट सिटी योजना भाजपाने गुंडाळल्याने पुण्याची शैक्षणिक व औद्योगिक ओळख धोक्यात आली असल्याचे सांगत जैवविविधतेकडे दुर्लक्ष झाल्याने टेकड्यांचे नुकसान होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सत्तेत आल्यानंतर या मुद्द्यांवर गांभीर्याने काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बीडीपी अंमलबजावणी या सरकारने करायला हवी होती. 2014 पासून काँग्रेस सत्तेत नाही आहे आम्ही सत्तेत आल्यास बीडीपी ची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करू असे चव्हाण म्हणाले.
सतेज पाटलांचा भाजपवर निशाणा
यावेळी सतेज पाटील म्हणाले की, ‘पुणे फर्स्ट’ हेच आघाडीचे मुख्य ध्येय राहणार आहे. पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. “भाजप जाहीरनाम्यात केवळ घोषणा असतात; अंमलबजावणी होत नाही,” अशी टीका करत पुणेकरांनी पाच वर्षांची संधी द्यावी, दिलेले शब्द आम्ही पाळू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरात कोयता गँगसारख्या घटना वाढत असून कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोप म्हणजे पुणेकरांच्या डोळ्यात धूळफेक असल्याची टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसचा जाहीरनामा हा शिवसेनेचा जाहीरनामा
काँग्रेस आणि शिवसेनेने स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला असला तरी काँग्रेसचा जाहीरनामा हा शिवसेनेचा जाहीरनामा आहे. आणि शिवसेनेचा जाहीरनामा हा काँग्रेसचा जाहीरनामा आहे, असे सतेज पाटील म्हणाले. पुणे या विद्यानगरीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर मांडला आहे कोयता गॅंग हा पुणेकरांसाठी परवनीचा शब्द म्हणून पुढे येत आहे.






