नायरमधील बंद कॅथलॅब पुन्हा सुरू होणार, लॅब बंद असल्यामुळे हृदयविकारग्रस्त रुग्णांवर आर्थिक बोजा
पालिकेच्या नायर रुग्णालयात गेल्या काही काळापासून बंद असलेले कॅथलॅब सेवा पुन्हा लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे हृदयविकाराशी संबंधित गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई पालिका आयुक्तांनी दुरुस्ती कामासाठी मंजुरी दिली असून संबंधित कंपनीला तातडीने दुरुस्ती करण्याबाबत कळविण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कॅथलॅब सेवा बंद असल्यामुळे नायर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसारख्या महत्त्वाच्या उपचारांसाठी इतर पालिका रुग्णालयांत वळवावे लागत होते. तर काही रुग्णांना नाइलाजाने खासगी रुग्णालयांची मदत घ्यावी लागत होती. यामुळे रुग्णांवर आर्थिक बोजा तर पडतच होता, शिवायउपचारासाठी होणारा विलंबही धोकादायक ठरत होता. कॅथलॅब सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर नायर रुग्णालयातच तातडीचे हृदयविकार उपचार उपलब्ध होणार आहेत. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांवर वेळेत उपचार करणे शक्य होणार असून अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यात ही सुविधा निर्णायक ठरणार आहे. सध्या कॅथलॅब सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया आणि प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात असून, लवकरच प्रत्यक्ष सेवा सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)
नायर रुग्णालयाच्या हृदयविकार विभागात दररोज सरासरी ८ ते १२ रुग्णांची अँजिओग्राफी, तर २ अॅजिओप्लास्टी केल्या जातात. याशिवाय पेसमेकर बसवणे आणि हृदयाच्या झडपांशी संबंधित उपचारही येथे नियमितपणे केले जातात. मात्र कॅथलॅब बंद असल्याने उपचारांवर परिणाम होत आहे.
निर्णयामुळे मध्य मुंबईसह परिसरातील हजारो हृदयरुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी नायर रुग्णालयातील कॅथलॅबमध्ये शॉर्टसर्किटची घटना घडली होती.या शॉर्टसर्किटमुळे यंत्रणेचे काही महत्त्वाचे पार्ट खराब झाले होते. परिणामी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, पेसमेकर बसवणे तसेच हृदयाशी संबंधित इतर उपचार बंद ठेवावे लागले होते.
बाहेर गेल्यानंतर वारंवार शिंका येतात? ‘हे’ उपाय केल्यास धुळीच्या अॅलर्जीपासून मिळेल कायमची सुटका
पालिका आयुक्तांची परवानगी मिळाली असून संबंधित कंपनीशी संपर्क साधण्यात आला आहे. दुरुस्तीसाठी आवश्यक पार्ट मागवून तातडीने दुरुस्ती करून देण्याबाबत कंपनीला कळविण्यात आले आहे. लवकरच कॅथलॅब सेवा रुग्णांच्या सेवेत पुन्हा रुजू होईल, अशी माहिती डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता, नायर रुग्णालय यांनी दिली आहे.






