संग्रहित फोटो
पुणे : पुण्यात गुन्हेगारी वाढली असून, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर धडक मोहीम उघडली आहे. या मोहिमेत अवघ्या २४ तासांत शहरातील ३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चार पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत तीन प्रौढांसह दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पुणे शहरात शस्त्रबंदी आदेश लागू आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सराईतांवर नजर ठेवली जात आहे. तर वर्षभरात साधारण साडे सहा हजार जणांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. विशेषतः विनापरवाना शस्त्रे बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. गस्त, संशयितांची तपासणी आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात येत आहे. चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडगावशेरी गावठाण परिसरात स्मशानभूमीजवळ गस्त घालताना पोलिसांना दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी उज्ज्वल विनोद लव्हे (वय २३, रा. देवाची उरुळी) आणि आकाश उर्फ गज्या अशोक मोरे (वय २०, रा वडगावशेरी) यांना ताब्यात घेऊन झडती घेतली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
तर, भारती विद्यापीठ पोलिसांनी लेकटाऊन रोडवरील राजाराम कदम जलतरण तलाव परिसरात कारवाई केली. यावेळी दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टा जप्त करण्यात आला. दोन्ही बालकांच्या पालकांना समजपत्र देण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पुणे शहरात बेकायदा शस्त्रे बाळगणाऱ्या तसेच गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
कोंढव्यात देशी पिस्तुलासह एकाला अटक
देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला कोंढवा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल व एक काडतूस जप्त केले आहे. अमन जमील खान (वय २७, रा. सुप्रीम लिगा सोसायटी, इनामनगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक संतोष खेतमाळस, गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र गावडे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. खान सराईत गुन्हेगार आहे. तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. कोंढवा परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी तपास पथकातील पोलिस कर्मचारी पुष्पेंद्र चव्हाण आणि केशव हिरवे यांना आरोपीची माहिती मिळाली.






