सौजन्य - सोशल मिडीया
नांदेड : राज्यात गुन्हेगारी वाढली असून दररोज खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. अशातच आता शाहूनगर, वाघाळा येथे किरकोळ वादातून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्या प्रकरणाचा नांदेड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि नांदेड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तेलंगणातील निजामाबाद येथे कारवाई करून सहा आरोपींना जेरबंद केले आहे.
१८ सप्टेंबरच्या रात्री शाहूनगर येथील वॉटर फिल्टर टँकजवळ किरकोळ कारणावरून संघरत्न ऊर्फ डोरेमॉन माधव वाघमारे (वय २०) याच्यासोबत काही जणांचा वाद झाला होता, यावेळी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. डोक्यावर, चेहऱ्यावर, मानेवर आणि छातीवर गंभीर जखमा झाल्याने त्याला उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
या घटनेप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२२४/२०२६ दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि नांदेड ग्रामीण पोलिसांची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी निजामाबाद येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १९ सप्टेंबर रोजी निजामाबाद येथे छापा टाकत सहाही आरोपींना ताब्यात घेतले.
अनेकांचा सहभाग
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजदीप ऊर्फ मोंटी दीपक तारू (वय १९), प्रवीण ऊर्फ बबलू रावसाहेब तारू (वय १९), आदर्श ऊर्फ अनिल संजय लोहकरे (वय २१), साईनाथ ऊर्फ साई राजू धुमाळे (वय २०), आदेश ऊर्फ बंटी संजय कांबळे (वय २१) आणि माधव आनंदा नवघरे (वय १९) यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशान्वये, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील व अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक गोविंद खैरे, पोलिस उपनिरीक्षक साईनाथ पुयड तसेच पोलीस अंमलदार गुरदिपसिंग कालरा, राजकुमार डोंगरे, ब्रम्हानंद लामतुरे, संदीप घोगरे, यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.






